नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का; सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

| Updated on: Jun 04, 2023 | 11:22 AM

Nashik News : सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का; सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. सहा नेत्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसंच नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनीही सेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

सुरगाणा नगरपंचायतमधील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, नगरसेविका अरुणाताई वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

त्याचं बरोबर नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आपल्यावर विश्वास ठेवून या राज्यातील अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत. सुरगाणा नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो. माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचा देखील खास स्वागत करतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गेली अनेक वर्षे माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी ऋषिकांत शिंदे मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. आपण ज्या विश्वासाने शिवसेनेत सामील होत आहात तो विश्वास आपला सार्थ होईल. मागील 10-11 महिन्यात सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. सर्व योजनांचे फायदे एकाच छताखाली देण्याचे आपण काम करायचं आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.

साधा एखादा दाखला मिळवण्याचं काम सर्वसामान्यांना करण्यासाठी चकरा माराव्या लागतात, असं होऊ नये. यासाठी ‘शासन आपल्यादारी’ सारखी योजना आपण आणली आहे. जे लाभार्थी आहेत त्यांना या सर्व योजनांची माहिती मिळाली पाहिजे किंवा जे काही दाखले पाहिजे ते एकाच ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शिवदूत नेमत आहोत, असं शिंदेनी यावेळी म्हटलं.