उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी.. सत्यजित तांबे यांचं ते ट्विट राजकीय? स्वतःच दिलं स्पष्टीकरण…

माझे वडील डॉ. सुधीर तांबे आणि आम्हा तांबे परिवाराच्या पाठिशी सगळे उभे राहिले. मला हे काम करण्याची संधी दिली. या संधीच्या माध्यमातून मी भरीव काम करेल, अशी ग्वाही सत्यजित तांबे यांनी केलं.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी.. सत्यजित तांबे यांचं ते ट्विट राजकीय? स्वतःच दिलं स्पष्टीकरण...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2023 | 2:40 PM

 उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी , नजरेत सदा नवी दिशा असावी….

घरटयाचे काय बांधता येईल केव्हाही , क्षितीजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी…

या ओळी काल सत्यजित तांबे यांच्या ट्विटरवरून वाऱ्यासारख्या पसरल्या. काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर सत्यजित तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये परततील की नाही, यावरून आ़डाखे बांधले जात आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघातून नुकतीच निवडणूक जिंकलेले आमदार सत्यजित तांबे यांनी मंगळवारी या ओळी ट्विट केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं. यावर आज तांबे यांनीच स्पष्टीकरण दिलंय.

सत्यजित तांबे सध्या मतदार संघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी दौरे करत आहेत. यावेळी अहमदनगर येथे त्यांनी ट्विटवर स्पष्टीकरण दिलं.

ते ट्विट राजकीय?

सत्यजित तांबे म्हणाले, माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही. सह्याद्री शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मी गेलो होतो. तेव्हा एका विद्यार्थ्याने ही कविता सादर केली. मला त्या ओळी आवडल्याने मी ते ट्विट केलं.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचू शकतो, याचा मी प्रयत्न करत आहात. माझे वडील डॉ. सुधीर तांबे आणि आम्हा तांबे परिवाराच्या पाठिशी सगळे उभे राहिले. मला हे काम करण्याची संधी दिली. या संधीच्या माध्यमातून मी भरीव काम करेल, अशी ग्वाही सत्यजित तांबे यांनी केलं.

बाळासाहेब थोरात- नाना पटोले वाद शमला?

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. सत्यिजत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं. तसंच या निवडणुकीत तांबे-थोरात कुटुंबाविरोधात मोठं राजकारण झाल्याचा आरोप केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी दर्शवत विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामाही थोरात यांनी दिला होता. मात्र हा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही. थोरात आणि पटोले यांच्यातील वाद निवळला असल्याची प्रतिक्रिया इतर काँग्रेस नेते देत आहेत.

पुण्यातील पोट निवडणुकांची जबाबदारीही बाळासाहेब थोरात यांना देण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. मात्र काही दिवसातच ते काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.