उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का… 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला? महापालिकेत मोठा उलटफेर… ऑपरेशन टायगर की विशेष निधीचे आमिष?
Uddhav Thackeray Eknath Shinde Operation Tiger: ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आमदार फुटण्याची चर्चा असताना नगरसेवकांना फुटणार का अशी चर्चा होत आहे.

Nashik Municipal Corporation: उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे सेना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे शिंदे सेनेतील नेते सांगत आहेत. 6 खासदार गेल्या महिन्यात फुटल्यानंतर ठाकरे सेनेचे 14 आमदार लवकरच शिंदे सेनेत येतील असा दावा करण्यात आला होता. तर राज्यातील काही महापालिकेतील नगरसेवकही शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात होते. आता ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक महापालिकेत मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये शिंदे सेना गेम करणार?
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतो. महापालिकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा होत आहे. अनेक नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आता पक्ष प्रवेश सोहळा कधी होणार याची चर्चा होत आहे. हे नगरसेवक कोण आहेत, यावरूनही चर्चा होत आहे.
विशेष निधी देण्याचे आमिष
या नगरसेवकांना प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचे अमिष दिल्याची चर्चा होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठा नेताही शिंदे सेनेच्या गळाला लागल्याचे म्हटले जात आहे. या पक्षांतर चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना वेग आला आहे. ऑपरेशन टायगरमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव सेनेला मोठा झटका?
नाशिक महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील आता 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आणि मनपा गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. शहरातील रस्त्यांची दुरावस्था, मोठे खड्डे, पाणी साचणे आणि इतर नागरी समस्यांवर निवेदन दिले.
मुंबई महापालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार
मानखुर्द-शिवाजीनगर परिसरातील नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणीदरम्यान परभणी येथील जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यांचे नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे. तर भाजपचा तिसरा नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवार नगरसेवक होण्याची शक्यता बळावली आहे.