आई होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू, नवी मुंबईत डॉक्टरांकडून निष्काळजीपणा!

गेली अनेक वर्षे नवी मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची ह्याचे उत्तर नवी मुंबईकरांना मिळालंच पाहिजे, असी भावना व्यक्त केली जातेय.

आई होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू, नवी मुंबईत डॉक्टरांकडून निष्काळजीपणा!
navi mumbai municipal corporation hospital
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 01, 2026 | 9:32 PM

Navi Mumba Hospital : आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. ग्रामीण भागात तर शासकीय रुग्णालयांची स्थिती अतिशय गंभीर आहे. रुग्णायातील स्वच्छतागृहे, उपचाराची व्यवस्था, रुग्णालयातील यंत्रणा अशा अनेक प्रकारच्या अडचणीत राज्यातील रुग्णव्यवस्था अडकलेली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयांत पुरेसे कर्मचारी नाहीत. काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली होती. तेथे गरोदर मातेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली होती. प्रवासासाठी डिझेल नसल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. परिणामी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने संबंधित गर्भवती महिलेच्या पोटातच बाळ दगावले होते. आता अशाच प्रकारची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीच्या शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या गर्भवती महिलेची प्रकृत गंभीर आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच दुसऱ्या गर्भवती रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना ऐरोली मनपा रुग्णालयातून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. या दाव्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

गेली अनेक वर्षे नवी मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची ह्याचे उत्तर नवी मुंबईकरांना मिळालंच पाहिजे, असी भावना व्यक्त केली जातेय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि तत्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणालाही सोडले जाता कामा नये, अशी मागणी केली जातेय.

एकही काच शाबूत ठेवणार नाही

नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही. न्याय मिळालाच पाहिजे अन्यथा मनसे आरोग्य विभागाच्या अधिकारी ह्यांच्या कार्यलयाची एकही काच शाबूत ठेवणार नाही, असा इशाराच मनसेचे नेते गजानन काळे यांनी दिला आहे.

Follow Us