AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!

मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती… मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!

| Updated on: Jul 01, 2026 | 4:45 PM
Share

महाराष्ट्र कृषीदिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणांबाबत सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार बियाणे, पशुपालन आणि दिवसा वीजपुरवठा या विषयांवर सरकारचे धोरण स्पष्ट करत त्यांनी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र कृषीदिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणांबाबत सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार बियाणे, पशुपालन आणि दिवसा वीजपुरवठा या विषयांवर सरकारचे धोरण स्पष्ट करत त्यांनी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीतील यांत्रिकीकरणासाठी देशात सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद महाराष्ट्र सरकारने केली आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आता सर्व प्रकारच्या बियाण्यांचे प्रमाणन (Certification) अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बनावट बियाण्यांवर आळा बसून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावरही सरकार भर देत असल्याचे सांगत फडणवीस यांनी देशातील कृषी क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेले पहिले AI अॅप महाराष्ट्राने विकसित केल्याची माहिती दिली. या अॅपच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होण्यास आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

फलोत्पादन क्षेत्रात गेल्या ३ वर्षांत राज्याने उल्लेखनीय प्रगती केली असून पशुपालन क्षेत्राचा विस्तार करून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे स्वरूप कसे बदलावे, यावरही सरकार अभ्यास करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सध्या राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात असून, हे वर्ष संपण्यापूर्वी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

तसेच सुरुवातीला शेतीसाठी दिवसा ८ तास वीजपुरवठा केला जाईल आणि पुढील टप्प्यात तो वाढवून १२ तासांपर्यंत केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Published on: Jul 01, 2026 04:45 PM

Follow Us