मी पायाने गाठ मारली तर, ती… उदय सामंत यांचं सूचक विधान, इशारा कुणाला?

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या 'मी पायाने गाठ मारली तर ती हातानेही सुटणार नाही' या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या सूचनेसह, सामंतांचा हा इशारा नेमका कुणाकडे आहे, राष्ट्रवादी की भाजप, याची चर्चा आहे. कार्यकर्ता मेळाव्यात दादागिरीला प्रत्युत्तर देताना, सामंत हतबल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विधानाने राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत.

मी पायाने गाठ मारली तर, ती... उदय सामंत यांचं सूचक विधान, इशारा कुणाला?
uday samant
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 12:59 PM

गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत चांगलेच चर्चेत आहेत. शिंदे गटाचे नेते भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सूचक विधान केल्याने मोठा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता सामंत यांचं आणखी एक विधान चर्चेत आलं आहे. मी पायाने गाठ मारली तर ती हातानेही सुटणार नाही, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे. सामंत यांच्या विधानाची चर्चा रंगली असून त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे? असा सवालही केला जात आहे.

चिपळूण येथील अलोरे येथे एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत आले होते. यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं. सध्या निवडणुकांचा किंवा राजकारणाचा मोसम नाही. मात्र, दादागिरी करून मतदारसंघात काम करता येईल, असे जर कोणाला वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. मी संयमी आहे. मी जी पायाने गाठ मारेन, ती कोणाला हातानेही सुटणार नाही, अशा शब्दांत उदय सामंत यांनी सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे सामंत यांचा इशारा कुणाकडे आहे? याची चर्चा आता रंगली आहे. सामंत यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस की भाजपकडे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Loading...

सामंत हतबल नाही

पक्ष जरी वेगळे असले, तरी माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर पालकमंत्री म्हणून उदय सामंत तेवढा हतबल नाही, याची नोंद काही लोकांनी घ्यावी, असा इशाराच उदय सामंत यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते सामंत?

उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली होती. चार वर्षापूर्वी राज्यात फार मोठं ऑपरेशन झालं आहे. तेव्हा तारीख आणि वेळ कुणाला माहीत नव्हती. त्यामुळे यावेळीही ऑपरेशन टायगर नक्की आहे. फक्त तारीख आणि वेळ सांगणार नाही? असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं होतं.

शिंदे योग्यवेळी निर्णय घेतील

सामंत यांनी ऑपरेशन टायगरवर सूचक विधान केल्यावर त्यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान केलं होतं. उदय सामंत यांच्या विधानामागचे कारण म्हणजे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. अनेकजण एकनाथ शिंदे यांना भेटतात. आमच्यासारख्यांना भेटतात. कधी पक्ष प्रवेश करायचा अशी त्यांची आमच्याकडे डिमांड असते. मात्र या सर्वांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, योग्य वेळी, योग्य निर्णय एकनाथ शिंदे घेतात, असं संजय शिरसाट म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us