महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचे 11 बळी, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; अमित शाह यांच्यावर निशाणा

| Updated on: Apr 17, 2023 | 7:47 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री नवी मुंबईतील रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या ढिसाळ नियोजनावरून राज्य सरकारवर टीका केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचे 11 बळी, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; अमित शाह यांच्यावर निशाणा
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येकजण नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांवरील उपचाराचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनावर टीका करतानाच भाजपचे नेते अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.

नागपूरहून आल्यावर या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर थेट इथेच आलो. जखमींची विचारपूस केली. चारपाच जणांशी बोललो. दोनजण गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाची चुकीची वेळ कोणी दिली आणि कशी दिली? ढिसाळ नियोजनामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. घटना दुर्देवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

चौकशी कोण कुणाची करणार?

भाजपचे नेते अमित शाह यांना गोव्याला जायचं होतं त्यामुळे कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आल्याची चर्चा आहे. याकडे उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेची चौकशी करतील की नाही माहीत नाही. तुम्ही म्हणालात तसं अमित शाह यांना जायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कुणाची करणार? असा सवाल करतानाच निरपराध जीव गेले आहेत. उगाचच एका चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. आम्हाला धर्माधिकारी कुटुंबाचा अभिमान आहे. अनेक पिढ्यांपासून धर्माधिकारी कुटुंब काम करत आहे. त्या कार्यक्रमाला केवळ अमित शाह यांना वेळ नव्हती म्हणून दुपारची वेळ घेतली असेल तर विचित्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 8 वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.