शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या ऑफरनंतर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत वेगळीच चर्चा; तटकरेंनंतर आणखी एका नेत्याने मनातलं सांगितलं
शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या ऑफरनंतर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. तटकरेंनंतर आणखी एका नेत्याच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दिवगंत अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा मार्ग निवडला होता. तर शरद पवारांनी विरोधी पक्षासोबत कायम राहिले. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच शरद पवारांनी सर्व शक्यता धुडकावून लावल्या आहेत. आम्ही कोणासोबत जाणार नाही. कोणाला यायचं असेल, तर या, अशा शब्दात शरद पवारांनी बंडखोरांना विलीनीकरणाची ऑफर दिली. शरद पवारांच्या विधानानंतर सुनील तटकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. शरद पवारांनी 6 दशके नेतृत्व करतात. त्यांच्या विधानाचा अर्थ अनेकदा कोणाला कळला नााही. त्यामुळे त्यांच्या विधानाचं उत्तर काळाच्या ओघातच मिळेल, असे तटकरे म्हणाले. अजितदादांच्या निधनानंतर माझ्यावर वरदहस्त असणारे नेतृत्व उरले नाही, अशी भावुक प्रतिक्रिया देखील तटकरेंनी दिली होती. तटकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या सलीम सारंग यांच्या विधानाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
…तर टार्गेट होणारच
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांनी भाष्य केलं. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली,तर आमच्यासोबत येऊ शकता. परंतु त्यांना सत्ता सोडवणार नाही, असं विधान रोहित पवारांनी केलं. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर सुनील तटकरे म्हणाले, ‘पवारसाहेब काय बोलले, यावर मी काही बोलणार नाही. पवारसाहेबांचं टायमिंग संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. अनेकदा त्यांनी साधलेलं टायमिंग महत्त्वाचं ठरले आहे. त्यांच्या विधानामागचा नेमका काय हेतू असू शकतो, या क्षणी सांगणे कठीण आहे’. तर त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर तटकरे म्हणाले, ‘आपण कोणाच्या राजकारणात अडथळा ठरत असेल, तर टार्गेट होणारच. मात्र सध्या संयमाची आणि राजकीय परिपक्वतेची कसोटी सुरू आहे’.
वीरू एकटा पडला
सुनील तटकरे यांच्यानंतर आणखी एका नेत्याने भावुक प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सलीम सारंग म्हणाले, सुनील तटकरे आणि अजितदादांची जोडी ही जय आणि वीरूसारखी होती. जय गेल्यानंतर वीरू एकटा पडला. अजितदादांच्या जाण्याने सुनील तटकरे यांचं नुकसान शब्दांत मांडणं कठीण आहे. पक्षातील निर्णय असोत, राजकीय संघर्ष असो किंवा कठीण परिस्थिती… अजितदादा आणि सुनील तटकरे यांनी अनेक प्रसंगी खांद्याला खांदा लावून काम केलं. दोघांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले. मात्र ही जोडी कायम चर्चेत राहिली. सुनील तटकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेवरही सारंग यांनी भाष्य केलं. ‘मोठ्या नेत्यांवर लांच्छनास्पद बोलणं आणि बोट दाखवणं अगदी सोपं झालं आहे. मात्र असं बोलणाऱ्यांनीही एकदा विचार करण्याची गरज आहे’.
तटकरे यांच्यावर भाष्य करताना सारंग म्हणाले, खासदार तटकरे हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक निवडणुका स्वत:च्या राजकीय ताददीवर लढल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनेकांच्या अनेक जागांवर पराभव झाला होता .परंतु तटकरेंनी रायगडचा गड कायम राखला होता’. तर सारंग यांनी अजितदादा-तटकरेंच्या जोडीला जय-वीरूची उपमा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.