विरोधक सरकारला घेरणार, शरद पवार यांचा मोठा निर्णय, पंढरपुरात महत्त्वाची बैठक
मोठी बातमी समोर येत आहे. आता शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम तर हातचा गेला, परंतु आता रब्बी हंगाम देखील संकटात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुष्काळी भागांची पहाणी सुरू आहे. शुक्रवारी राज्य सरकारकडून दुष्काळासंदर्भातील जीआर काढला जाणार आहे. राज्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. जवळपास सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही दुष्काळासंदर्भातील जीआर काढणार आहोत. आपली दुष्काळाची जी संहिता आहे, त्या संहितानुसार ट्रिगर वन प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याचा जो काही शासन आदेश आहे, तो आदेश आम्ही काढणार आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे, ते अमरावतीमध्ये बोलत होते.
दरम्यान दुसरीकडे आता विरोधकांनी देखील राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवा, यासारख्या काही मागण्या विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता स्वत: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.
शरद पवार हे राज्यातील दुष्काळी भागांचा दौरा देखील करणार आहेत, परंतु या दौऱ्यापूर्वी शरद पवार हे पंढरपुरात मोर्चा काढणार आहेत. पंढरपुरात शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ मोर्चा काढणार आहेत. येत्या 26 सप्टेंबर रोजी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. दुष्काळ मोर्चाच्या नियोजनासाठी पंढरपुरात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मात्र या बैठकीला आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील यांनी दांडी मारली.
वातावरण तापणार
शरद पवार महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत, परंतु त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला जाणार आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे.