
रायगड जिल्ह्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांना जोरदार धक्का बसला आहे. अलिबाग, महाड, श्रीवर्धन येथे शिंदेंच्या शिवसेनेसह शेकापने राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपला गढ राखत तटकरे यांना कोंडीत पकडले आहे. येथे शिवसेनेचे सुनील कविसकर विजयी झाले असून त्यांनी सुदेश कळमकर यांचा पराभव केला आहे. श्रीवर्धनमध्ये देखील तटकरे यांना फटका बसला आहे. येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगले विजयी झाले आहेत.तर राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र सातनाक यांचा पराभव झाला आहे. श्रीवर्धन हा मंत्री आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदार संघ आहे. अतुल चौगले यांच्या स्वागतला गोगावले गेल्याने खासदार सुनील तटकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या निकालानंतर महायुतीतच आरोप–प्रत्यारोपांना धार आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हावर लढलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले निवडून आल्यानंतर मंत्री भरत गोगावले हे श्रीवर्धन येथे चौगुले यांचा विजय साजरा करण्यासाठी गेले होते. त्यावर खासदार सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. महाडहून श्रीवर्धनमध्ये झालेल्या स्वागत कार्यक्रमाचा संदर्भ देत तटकरे यांनी तोफ डागली आहे.
तटकर यावेळी म्हणाले की गेल्या अडीच–तीन वर्षांत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणारी मंडळी आज त्यांच्या विजयाच्या स्वागतासाठी उभी असल्याचा टोला तटकरे यांनी लगावला आहे. यावेळी ग्रामीण म्हणीचा वापर करत ते म्हणाले की “पाचवी कोणाकडे आणि घुगऱ्या कोण करते.ज्याच्याकडे मयती आहे, तेच घुगऱ्या करत आहेत… आणि ज्यांची पाचवी आहे त्यांचे वेगळेच काय” असा टोला त्यांनी अप्रत्यक्ष मंत्री भरत गोगावले यांना लगावला आहे.
जे निवडून आलेत ते उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्यांची निशाणी मशाल आहे. काल सगळे महाडवरून विजयी झाल्यानंतर श्रीवर्धनमध्ये गेले होते, कोणासाठी जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती निवडून आले ते त्यांच्या विजयासाठी, आनंद व्यक्त करायला महाडवरून गेले होते. गेल्या अडीच तीन वर्षे उद्धवजींना शिव्या शाप देत लाखोली वाहत होते. त्यांच्याबद्दल अनुद्गार काढत त्यांच्यावर किंवा आदित्य ठाकरेंवर ही मंडळी टीका करत होती. ती त्या ठिकाणी स्वागताला गेली.आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे पाचवी कोणाकडे चालते आणि घुगऱ्या कोण करते. ज्यांच्याकडे मयती आहे तेच घुगऱ्या करत आहेत. ज्यांची पाचवी त्यांचं वेगळंच काय असे तटकरे यावेळी म्हणाले.