NCP Politics : दादांना मृताग्नी देण्याआधी काही लोकांनी…राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांचा खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट
रुपाली पाटील म्हणाल्या की उमेश पाटील नाव घ्यायला घाबरत असावेत. त्यावर ते म्हणाले की, "उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही. उमेश पाटील अजितदादांचा कार्यकर्ता आहे. दादा जसे निडर होते, तसाच उमेश पाटील आहे"

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु झाला आहे. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना बदलण्याचा सल्ला दिला आहे. आज रुपाली ठोंबरे पाटील यांनी दोन ते तीन वर्ष झालीत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही. पण त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? या बद्दल टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला.”कोणाला उद्देशून, काही व्यक्तींना समोर ठेऊन ती पोस्ट केलेली नाही. कोणी एक व्यक्ती असू शकत नाही. पवार कुटुंबावर प्रेम करणारी मोठी जनता आहे. दादांच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी 25 लाखापेक्षा जास्त लोक जमा झाले होते. त्यावेळी महाराष्ट्राला कळलं, अजितदादा किती मोठा लोकनेता आपल्यातून निघून गेला” असं उमेश पाटील म्हणाले.
“दादा गेल्यानंतर दादाचं महत्व महाराष्ट्राला, देशाला कळलं. त्यापूर्वी या कुटुंबातील सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार यांचं रुटीन आयुष्य वेगळं होतं. दादा गेल्यावर त्यांचं आयुष्य 360 डिग्रीमध्ये बदलून गेलं. सुनेत्रा वहिनींवर संपूर्ण पक्षाची, सरकारमध्ये जबाबदारी आली. दादांच्ं एवढं मोठं महाराष्ट्रभर विस्तारलेलं कुटुंब आहे. ती सांभाळण्याची जबाबदारी आली. ज्यांना या गोष्टीची सवय नाही, कधी यात लक्ष घालावं लागेल असं वाटलं नाही त्यांच्यावर आयुष्याच्या अशा वळणावर जबाबदारी आली” असं उमेश पाटील म्हणाले. “सर्वांच नैतिक कर्तव्य आहे. विशेषकरुन पक्षातल्या लोकांचं आहे. माणूसकी आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. सुनेत्रा वहिनी महिला आहेत, अजितदादांच्या पत्नी आहेत. हे माहित असताना वेगवेगळे राजकीय हेतू मनात ठेऊन वेगवेगळ्या कारणाने त्या परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या सहा महिन्यापासून पक्ष नेतृत्वाबद्दल कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय” असा दावा उमेश पाटील यांनी केला.
उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही
रुपाली पाटील म्हणाल्या की उमेश पाटील नाव घ्यायला घाबरत असावेत. त्यावर ते म्हणाले की, “उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही. उमेश पाटील अजितदादांचा कार्यकर्ता आहे. दादा जसे निडर होते, तसाच उमेश पाटील आहे. उलट दोन पावलं पुढे आहे. चांगल्या, चांगल्या प्रस्थापितांना या उमेश पाटीलने शिंगावर घेतलं आहे. त्यामुळ कोणाला घाबरण्याचा मुद्दा नाही”
तुम्ही शोध घ्या कोणी आमच्या आमदारांना फोन केले
तुम्ही नाव घेतलं नाहीय, तुमच्या टि्वटमुळे सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो, या प्रश्नावर उमेश पाटील यांनी उत्तर दिलं. “त्रास देणारे कोणी सांगून त्रास देत नाहीत. दादांच्या मृत्यूनंतर, अपघात झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी अंत्यविधी झाला. या दरम्यानच्या कालावधीत तुम्ही शोध घ्या कोणी आमच्या आमदारांना फोन केले, कशासाठी केले, कुठल्या उद्देशाने केले. दादांना मृताग्नी देण्याआधी काही लोकांनी शपथविधीची तयारी चालू केलेली. हा मंत्री होणार, तो केंद्रात जाणार, कुठे आहे दु:ख. त्या परिवारावर एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांना आधार, सांत्वनाची गरज असताना राजकीय आडाखे बांधत होती काही लोकं. तुम्ही माहिती घ्या. सूत्रांच्या माध्यमातून पत्रकारांना माहिती मिळत असते, मग ही माहिती कशी मिळाली नाही” असा गौप्यस्फोट उमेश पाटील यांनी केला