Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी टाकला नवा डाव
नागपूर पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी नवा डाव टाकला आहे.

नागपूर पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने अभिजीत वंजारींना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन मोठ्या पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता बंडखोरी सुरू झाली आहे. भाजपच्या अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर शरद पवार गटाचे नितेश कराळे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.
शरद पवार गटाचे नितेश कराळे हे आज सोमवारी नागपूर पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नागपूरच्या संविधान चौकातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कराळे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु खुद्द नितेश कराळे यांनी बंडखोरीवा दावा खोडला आहे. पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत चिन्ह राहत नाही, त्यामुळे याला बंडखोरी म्हणता येणार नसल्याचे मत कराळे गुरुजींनी व्यक्त केलं आहे. तसेच मला मोठ्या संख्येने मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच सर्वपक्षीय अनेकांचा पाठिंबा असल्याचा विश्वास कराळेंनी व्यक्त केला आहे. हा पदवीधराचा मतदारसंघ आहे आणि तिथे पदवीधरसाठी लढणारा माणूस राहिला पाहिजे. प्रचलित व्यवस्थेमध्ये एखादा प्रस्थापित माणूसच पाठवायचा आणि त्याच्या शाळा-कॉलेज वाचवण्यासाठी किंवा एखादा माजी आमदार जो त्याचं प्रस्थ वाचवण्यासाठी त्यांना सीट देऊन आणि घराणेशाही चालवून हे कुठेतरी प्रस्थापित पदवीधरांचे प्रश्नच मांडत नाहीत, असा आरोप कराळे यांनी केला. त्याच्यामुळे तिथे एखादा शेतकऱ्याच्या पोरासाठी लढणारा, बेरोजगार युवकासाठी लढणारा, कर्मचाऱ्यांचे मुद्दे घेऊन लढणारा एखादा पदवीधर सुशिक्षित माणूस जर तिथे गेला, तर तो चांगले मुद्दे मांडू शकेल… त्याच्यामुळे बंडखोरी याला म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हटलं. दरम्यान, कराळे मास्तर काही आठवड्यांपूर्वी तुरुंगातून जामिनावर बाहेर आले आहेत. एका विधानामुळे त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी कराळे मास्तर हे जामिनावर बाहेर आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी समाजकार्य, राजकारण सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.