Shivsena UBT Spilt : ठाकरे गटाचे फुटलेले सहा खासदार कधी समोर येणार? शिंदेंच्या शिवसेनेत कधी प्रवेश होणार, माहिती आली समोर
Shivsena UBT Spilt : उद्धव ठाकरे गटाचे फुटलेले सहा खासदार कधी समोर येणार? एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत कधी प्रवेश करणार, या संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ शंभर टक्के यशस्वी झाले असून ठाकरे गटातील सहाही खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. आज ठाकरे गटाने दिल्लीतील संसदेच्या पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित राहिले.भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश अष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि संजय पाटील ही फुटलेल्या सहा खासदारांची नावं आहेत. ठाकरे गटातील या फुटीनंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा जळगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. “‘ऑपरेशन टायगर’ शंभर टक्के यशस्वी झाले असून ठाकरे गटातील सहाही खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ठाकरे गटाचा व्हिप लागू होणार नाही” असं किशोर पाटील म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे सहाही खासदार शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला.
“एकनाथ शिंदे एखाद्या विषयात लक्ष घालतात तेव्हा तो विषय पूर्णत्वास जातो” असेही ते म्हणाले. दरम्यान, शिंदे गटाची खासदार संख्या 13 वर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे मिळतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. तसेच संबंधित खासदारांसोबत शिवसैनिक ठामपणे उभे राहतील आणि कोणत्याही विरोधाला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत, खासदार पक्ष सोडून का जात आहेत? याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला. उद्या 19 जून शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.
संजय जाधव यांना सोनपेठ मध्ये फिरू देणार नाही
परभणीत खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सोनपेठ शहरातून खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत शिवसैनिकांनी आंदोलन केलं. संजय जाधव यांच्या बंडखोरी नंतर शिवसैनिकांचं आंदोलन.संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. खासदार संजय जाधव यांना सोनपेठ मध्ये फिरू देणार नसल्याचा शिवसैनिकांचा आक्रमक पावित्रा.