चोरांचा खेळ खल्लास, सायबर पोलिसांची ‘डिजिटल’ कमाल! तब्बल 1 कोटींचे 410 मोबाईल नागरिकांना केले परत

Kolhapur Cyber Police : कोल्हापूर सायबर पोलिसांनी चोरांचा खेळ खल्लास केला. सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरीला गेलेले सुमारे 1 कोटी रुपयांचे 410 मोबाईल हस्तगत केले. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत दिले.

चोरांचा खेळ खल्लास, सायबर पोलिसांची डिजिटल कमाल! तब्बल 1 कोटींचे 410 मोबाईल नागरिकांना केले परत
1 कोटींचे 410 मोबाईल नागरिकांना परत
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 12:16 PM

कोल्हापूर सायबर पोलिसांनी कमाल केली आहे. त्यांनी चोरट्यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. वर्दळीच्या ठिकाणी, रेल्वे, एसटी बसस्टँड, धार्मिक स्थळं याठिकाणी चोरटे नागरिकांवर नजर ठेवून असतात. बेसावध क्षणी ते अलगद खिशातून मोबाईल ढापतात. मोबाईल चोरतात. हे काम इतके सराईतपणे केले जाते की, मालकाला बऱ्याचवेळानंतर मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येते. नागरीक मोबाईल चोरीच्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे जातात. मोबाईल मिळणार नाही पण तक्रार करावी असा त्यांचा सूर असतो. पण कोल्हापूर सायबर पोलिसांनी अशा मोबाईल मालकांना मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 1 कोटी रुपयांचे 410 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तक्रारकर्त्यांना हे मोबाइलही परत करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक महागड्या मोबाईलचा समावेश आहे. अनेकांसाठी हा सुखद धक्का आहे. आतापर्यंत मोबाईल चोरीला गेला की तो मिळत नाही असाच समज होता. हा समज कोल्हापूर सायबर पोलिसांनी खोडून काढला आहे.

मोबाईल हस्तगत कतर मुळ मालकांना परत

चोरीला गेलेले सुमारे 1 कोटी रुपयांचे 410 मोबाईल कोल्हापूर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी हस्तगत केलेत. इतक्यावरच न थांबता पोलिसांनी ज्यांच्या तक्रारी आल्या होत्या. ज्यांनी मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यांना हे मोबाईल परत केले आहे. वर्षभरात चोरीला गेलेले 1 हजार पेक्षा अधिक मोबाईल मूळ मालकांना परत दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावाही यावेळी पोलिसांनी केला.

12 आयफोनसह विविध कंपन्यांचे महागडे फोन

चोरीला गेलेल्या स्मार्टफोनपैकी 12 आयफोन होते. आयफोनची किंमत 50 हजारांपेक्षा लाखांच्या घरात आहे. या मालकांचा जीव कधीचाच टांगणीला लागला होता. इतका महागडा मोबाईल चोरीला गेल्याने त्यांची झोप उडाली होती. अनेक जण त्यांच्या धांदरटपणावर संतापले. या सह विविध कंपन्यांच्या फोनचा यामध्ये समावेश आहे. ही महागडे मोबाईल पुन्हा परत मिळाल्याने मोबाईलधारकांच्या चेहऱ्यावर मोठे हसू फुलले होते. त्यांनी सायबर पोलिसांचे आभार मानले.

या राज्यातून मोबाईल केले हस्तगत

कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांसह महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हे मोबाईल कोल्हापूर सायबर पोलिसांनी जप्त केले. आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या उपस्थितीत ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. सध्या राज्यभरामध्ये मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत हे 410 मोबाईल जप्त करत राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us