दुष्काळाच्या तीव्र झळा, जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा घसा कोरडा, उमरगा तालुक्यातील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
Umarga Zilla Parishad Schools Drinking Water: राज्यात ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्या आहेत. आताच अनेक पाणवठे, मोठ्या नद्या, धरणे, तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तर जिल्हा परिषदेतील शाळांनाही त्याचा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचा घसा कोरडा पडला आहे.

Umarga Zilla Parishad Schools Drinking Water: राज्यातील 304 तालुक्यात दुष्काळाचा नांगर फिरला आहे. ग्रामीण भागात अत्यंत विदीर्ण अवस्था आहे. अनेक गावं ओस पडत आहेत. केवळ वयोवृद्धचं गावात थांबलेली आहेत. हाताला काम नाही, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न ग्रामीण भागात आ वासून उभा आहे. आताच अनेक पाणवठे, मोठ्या नद्या, धरणे, तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तर जिल्हा परिषदेतील शाळांनाही त्याचा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचा घसा कोरडा पडला आहे.
शाळांमध्ये पिण्याचे पाणीच नाही
धाराशीवच्या उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांना दुष्काळाचा फटका बसला आहे. उमरगा तालुक्यातील तब्बल ३० शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. पाणीटंचाई आढावा बैठकीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना आता पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. ही बाब समोर येताच तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शिवसेना आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले. ग्रामपंचायत आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळाचा फटका थेट शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून, प्रशासन यावर किती लवकर उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागले आहे.
उमरगा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
उमरगा तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील ३६ गावातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. या गावातून पाण्यासाठी टँकर आणि अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. एकूण ११२ पैकी ९९ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. १० प्रस्ताव मंजूरीसाठी तर ३ प्रस्ताव पंचनाम्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
काही गावात पाण्याचे मुख्य स्त्रोत आटल्याने धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी १५ अधिग्रहण पूर्णपणे थांबलेले आहेत. यामध्ये कदेर येथील ३, वेलंब, काळा निंबाळा, बलसुर येथील प्रत्येकी १, नाईचाकुर येथील ५ आणि पेठसांगवी येथील ४ अधिग्रहणांचा यामध्ये समावेश आहे. विहिरी आणि बोअरवेल कोरडेठाक पडल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिला, लहान मुलांना दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.
अजून आठ महिन्यांचे आवाहन
पाणी पातळी खोल गेली आहे. नवीन बोअरवेलही काही ठिकाणी फेल गेले आहे. त्यांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे. एकीकडे जनावरे, पिके वाचवण्याची धडपड तर घरी सुद्धा पाण्यासाठीची बोंबाबोंब अशी बिकट अवस्था गावा गावात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. अजून तीव्र उन्हाळा यायचा आहे. हिवाळ्यातच ही परिस्थिती आहे. अजून आठ महिन्यांचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे. त्यासाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.