
जळगाव: राजकारणात नेत्यांची सर्व मदार ही कार्यकर्त्यांवर असते. कार्यकर्ते मेहनती असेल तर नेता मोठा होण्यास वेळ लागत नाही. पण नेता मोठा असेल, तो कितीही चांगला असेल, पण त्याचे कार्यकर्ते चांगले नसतील तर नेत्यांना अडचणी होतातच. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेता आणि कार्यकर्त्यांच्या नेमक्या याच संबंधावर बोट ठेवून कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. नेता कितीही चांगला असला पण कार्यकर्त्यांनी प्रॉब्लेम केला तर नेत्याचा कार्यक्रम होतोच, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आपण निवडणुकीत पडल्यानंतर कसे सुधारलो याचा किस्साही त्यांनी ऐकवला.
नेता चांगला असेल मात्र त्याचे काही कार्यकर्ते अडचणी निर्माण करत असतील तर मोठा कार्यक्रम होऊन जातो. मी ज्यावेळी चार हजार मतांनी पडलो त्याचे मूळ कारण माझे काही कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी जो उन्माद केला, त्यामुळे मी पराभूत झालो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील चांगला आहे. मात्र त्यांना निवडून दिल्यास कार्यकर्ते उन्माद करतील असं मतदारांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मला पाडलं. त्या निवडणुकीत मी 4 हजार मतांनी पडलो. त्यामुळे नेत्यासोबत कार्यकर्ते देखील चांगले असले तर नेता पुढे जातो, असं ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सिडेंट हो जायेगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
गाडीचा वेग जर जास्त झाला तर त्यासाठी ब्रेकरची गरज असते. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडीबरोबर चालवतो, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.
राजकारणामध्ये खेळ जसा समोर येतो तसा खेळ खेळावा लागतो. सध्या राजकारणात खेळ सावल्यांचा चालला आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळेच गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे हा हल्ला चढवला.
पैशाने सर्व साध्य झालं असतं तर या देशाचे पंतप्रधान टाटा बिर्ला झाले असते. नरेंद्र मोदी राहिले नसते, असंही त्यांनी सांगितलं. जो काम करतो जनता त्याच्या मागे राहते. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. पैशाने सर्व साध्य होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं