VIDEO | उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच, पूराच्या पाण्यातून 459 जणांना वाचवले

| Updated on: Sep 28, 2021 | 11:58 PM

जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणे शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. 

VIDEO | उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच, पूराच्या पाण्यातून 459 जणांना वाचवले
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा हाहाःकार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असून एनडीआरएफ टीमकडून 16 जणांचे बचाव कार्य यशस्वी झाले. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणे शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली.  (Maharashtra weather update, Rains continue in Osmanabad district, 459 rescued)

येथे झाली अतिवृष्टी

उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील अंदाजे 125 लोक, इर्ला येथील अंदाजे 114 लोक, तेर येथील अंदाजे 35 लोक, दाऊतपूर येथील अंदाजे 90 लोक, बोरखेडा येथीलअंदाजे 35 लोक, कामेगाव येथील अंदाजे 40 व्यक्तींना आणि वाकडीवाडी येथील 20 जणांसह अशाप्रकारे एकूण 439 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यातील सहा, तुळजापूर तालुक्यातील दोन, कळंब तालुक्यातील तीन तर उमरगा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली.

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी 66.3, पाडोळी 81, केशेगाव 71, ढोकी139.5, जागजी123.8 तर तेर मंडळात 127.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील सलगरा 65.5, इटकळ 83.3, कळंब तालुक्यातील मोहा 66.3,शिराढोण 171, गोविंदपूर-107.5 तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात 69 मिलीमीटर पावसाची म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात या अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड झाली आहे. मांजरा आणि तेरणा पात्रालगतच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

शेतीचे नुकसान

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे 15 लाख 87 हजार 805 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 46 हजार 712, जालना जिल्ह्यात 2 लाख 38 हजार 872 , परभणी जिल्ह्यात 1 लाख 75 हजार 511, हिंगोली जिल्ह्यात 6 हजार 883, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3 लाख 86 हजार 48, बीड जिल्ह्यामध्ये 54 हजार 421, लातूर जिल्ह्यात 6  हजार 122, उस्मानाबाद जिल्ह्यात 3 हजार 491 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यलयात करण्यात आली आहे.

औरंगाबादमधील धमोरीतील महापुरात दोघे वाहून गेले

गंगापूर तालुक्यातील धमोरी गावातही पूराचा फटका बसला. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाने नागझरी नदीला पूर आला आहे. या पुरातून गावाकडे परतण्यासाठी दोघे शेतकरी हे पात्र पार करत होते. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा अफाट आणि वेगवान होता की या दोघांना त्यात तग धरणे मुश्कील झाले. अर्धी नदी पार केल्यानंतर काहीच अंतर शिल्लक असताना पाण्याच्या वेगासोबत हे दोघे शेतकरी वाहून गेले. दोन शेतकरी वाहून जातानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात झाला कैद झाला आहे.

खोपोलीतील झेनिथ धबधब्यात तीन पर्यटक वाहून गेले

झेनिथ धबधब्यावर सहलीसाठी आलेले तीन पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना खोपोलीत घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका आठ वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. महिलांचे मृतदेह हाती लागले असून चिमुरडा अद्याप बेपत्ता आहे. रेस्क्यू पथकाकडून चिमुरड्याचा शोध सुरु आहे. मेहरबानू खान( 40), रुबिना वेळेकर (40), आलंमा खान (8) अशी वाहून गेलेल्या तिघांची नावे असून हे खोपोली येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब व मित्र परिवारातील 12 जणांना रेस्क्यू करण्यात यश आले असून बेपत्ता चिमुरड्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. (Maharashtra weather update, Rains continue in Osmanabad district, 459 rescued)

खोपोलीतील झेनिथ धबधब्यात तीन पर्यटक वाहून गेले; आठ वर्षाचा चिमुरडा बेपत्ता

अतिवृष्टी, पुरस्थितीचा अजित पवार यांनी घेतला आढावा, जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश