
कराड : बाजार समितीचे निकाल लागले आहेत. या निकालात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. हा निकाल येताच राष्ट्रवादी काँग्रेसने आता थेट मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे विधान करून आघाडीतील नेत्यांची झोप उडवली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल येताच जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता सगळ्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरच भाष्य केल्याने पाटील यांच्या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. मात्र, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ अभेद्य असल्याचंही म्हटलं आहे.
राज्यातल्या बाजार समितीतील महाविकास आघाडीला मोठं यश आलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आघाडीच्या बाजूनेच कल दाखवला आहे. त्यामुळे आघाडीची वज्रमुठ अभेद्य, भेगा नाही तर वज्रमूठ मोठ्या क्षमतेची असल्याचं आज विरोधकांना कळलं असेल, असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला.
शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून नऊ महिन्यात राज्यात 1200 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, तसेच बाजार समितीच्या निवडणूका किचकट करण्याचे काम देखील शिंदे सरकारकडून करण्यात आले. त्यामुळे सर्वांचा रोष म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सरकार विरोधात महाविकास आघाडीला कौल दिला आहे. त्याच्यबरोबर राज्यातील 148 पैकी 75 मोठ्या बाजार समिती मध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान जयंत पाटील यांनी इस्लामपुरात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची पुन्हा एका हाती सत्ता आली आहे. इस्लामपुरात राष्ट्रवादीला 18 पैकी 17 जागा मिळाल्या आहेत. विरोधी सर्वपक्षीय आघाडीला हमाल तोलाईदार गटातून फक्त एक जागा मिळाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी पुन्हा बाजार समितीवर राखलं आपलं वर्चस्व दाखवलं आहे.