Raju Shetti: तर तुमची दिवाळी होणार नाही, राजू शेट्टी यांनी सरकारला ठणकावले, ऊस दराचे आंदोलन पेटणार?

Swabhimani Shetkari Saghatana Sugarcane Protest: गेल्या 46 तासापासून पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या.

Raju Shetti: तर तुमची दिवाळी होणार नाही, राजू शेट्टी यांनी सरकारला ठणकावले, ऊस दराचे आंदोलन पेटणार?
तर तुमची दिवाळी होणार नाही, राजू शेट्टी यांनी सरकारला ठणकावले, ऊस दराचे आंदोलन पेटणार?
| Updated on: Nov 05, 2026 | 10:43 AM

Raju Shetti reaction on Sugarcane Protest: ऊसदर वाढीसाठी पुणे-बंगळुरू महामार्ग गेल्या 46 तासांपासून ठप्प आहे. ऊसाची पहिली उचल 4200 रुपये मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्रात आक्रमक झाली आहे. हजारो वाहने रस्त्यावर खोळंबली आहे. तर दिवाळीसाठी येणारी चाकरमानही धास्तावली आहे. एसटी महामंडळाचे गेल्या दोन दिवसात मोठे नुकसान झाले आहे. तर टीव्ही 9 मराठीशी बोलताना नेते राजू शेट्टी यांनी समजूतदारपणाचा ठेका काय आम्हीच घेतला आहे का, असा रोकडा सवाल विचारला. आमची दिवाळी होणार नसेल तर तुमची दिवाळी सुद्धा होणार नाही असे त्यांनी सरकारला ठणकावले आहे.

राजू शेट्टी यांचा रोकडा सवाल

Loading...

मधल्या १६७५ रुपयांचे ते काय करणार आहेत? ते कुणाच्या खिशात जाणार आहेत, कोणा कोणाच त्यात हिस्सा आहे, अशी प्रश्नांच्या फैरीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी झाडल्या. हे पैसे कुठे जाणार हे सामान्य नागरिकांनाही कळायला हवे, असे ते म्हणाले. राजू शेट्टी यांनी ऊस दराबाबत काही शंका उपस्थित करत शेतकऱ्यांना कसं नागवलं जात आहे, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आंदोलन अचानक नाहीच

सध्या माल वाहतूक खोळंबल्याचे, चाकरमानी अडकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केल्यावर राजू शेट्टी यांनी सणसणीत प्रतिक्रिया दिली. आम्ही काही अचानक रस्त्यावर आलेलो नाही. आधी आम्ही हुबळीला गेलो. दिल्लीला गेलो. दरम्यानच्या काळात ऊस परिषद झाली. मोटारसायकल फेरी घेतली. प्रत्येक कारखानदाराच्या दारात गेलो. मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यात आमचे ३५ दिवस गेले. यांना तर १ ऑक्टोबर रोजीच कारखाने सुरू करायचे होते, असे राजू शेट्टी म्हणाले.

ऊस म्हणजे काय भुसा वाटला काय?

राजू शेट्टी यांनी सरकारच्या वेळकाढू भूमिकेवर झणझणीत प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस म्हणजे तुम्हाला काय भुसा वाटला काय? असा खणखणीत सवाल त्यांनी विचारला. त्याला काही किंमत आहे की नाही, १८-१८ महिने शेतकऱ्याने तळहातावरील फोडाप्रमाणे ऊस जपायचा आणि यांनी गुंडागर्दी करून ऊस न्यायचा आहे. ऊस द्यायचा नाही म्हटले की, गुंडागर्दी करून दमदाटी करून ऊस कारखान्यात न्यायचा. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करायचे. कुठली आली ही पद्धत? असा रोखठोक सवाल राजू शेट्टी यांनी विचारला.

रस्ता ठप्प झाला आहे. थोडं समजूतदारपणे घ्या असे प्रशासनाने आवाहन केले आहे. समजूतदारपणाचा ठेका काय एकट्या शेतकऱ्यांनीच घेतला आहे का? लुटारूंनी समजूतदारपणा नाही दाखवायचा. लुटारू मनमानेल तसे वागणार, पण शेतकऱ्यांकडून अपेक्षा ठेवायच्या. का? जनतेला त्रास होऊ नये म्हणून आणि सरकार काय करणार, त्या लुटीतील हिस्सा मागणार, असा सणसणीत टोला शेट्टी यांनी लगावला. आमची दिवाळी झाली नाही तर याला जबाबदार असणाऱ्यांची दिवाळी सुद्धा होणार नाही. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, असे राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us