मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सेना आमदाराकडून केराची टोपली, कोरोना काळात जंगी मिरवणूक!

| Updated on: Sep 05, 2021 | 3:34 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरही शिवसेनेचेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी भर पावसात गर्दी जमवून मिरवणूक काढली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सेना आमदाराकडून केराची टोपली, कोरोना काळात जंगी मिरवणूक!
शहाजी पाटील (शिवसेना आमदार)
Follow us on

सांगोला : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सांगोल्यात ज्या नेत्यासाठी सभा घेतली, संवेदनशील, लोकांच्या प्रश्नांची जाण आणि गोरगरिबांची कणव असेलला नेता म्हणून ज्यांचा उल्लेख केला, ज्यांच्यासाठी मतरुपी आशीर्वाद मागितले, त्याच नेत्याने आमदार झाल्यावर मात्र ऐन कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी तुडवले आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी कोरोनाच्या भयाण संकटात गर्दी जमवून मिरवणूक काढली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शहाजी पाटलांकडून केराची टोपली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरही शिवसेनेचेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी भर पावसात गर्दी जमवून मिरवणूक काढली. सांगोल्यातील खवासपूर गावात ही जंगी मिरवणूक पार पडली. गेल्या महिन्यात सांगोल्यात कोरोनाचा प्रकोप सुरु होता. आताही तिसऱ्या लाटेचा धोका असताना अशा कार्यक्रमांमुळे कोरोना वाढण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असतानाही राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्दी केली जात आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांची सांगोल्यातील खवासपूर या गावात चक्क भर‌‌ पावसात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावकऱ्यांची तसंच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.

आजही पवारांच्या-गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच जुन्नर-आंबेगाव दौऱ्यावर गेले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला लोकांनीही तुफान गर्दी केली होती. मात्र उपस्थितांच्या तुफान गर्दीवर पवार आणि वळसे पाटलांनी ओझरतं बोलताना एका वाक्यात विषय कट केला. उपस्थितांचे मोजक्या शब्दात कान टोचताना गर्दीवर दोन्ही नेत्यांनी अधिकचं बोलणं टाळलं.

दोघा नेत्यांकडून एका वाक्यात ‘विषय कट!’

एकीकडे शासन प्रशासन सर्वसामान्यांना गर्दी करु नका, निर्बंध पाळा असं आवाहन करत असताना राजकीय कार्यक्रमांना मात्र तुफान गर्दी होते. याचविषयीचा उल्लेख आपल्या भाषणात पवार आणि वळसे पाटील यांनी केला. मात्र तो ही एक-दोन वाक्यात……..! कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे गर्दी टाळायला हवी, लोकांना समोरासमोर भेटणं टाळायला हवं, असं पवार म्हणाले. तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर,आंबेगाव, जुन्नरमध्ये अद्याप कोरोना बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे, असं म्हणत समोर जमलेल्या गर्दीचा उल्लेख टाळत वळसे पाटलांनी उपस्थितांचे कान टोचण्याचे प्रयत्न केले.

हे ही वाचा :

शरद पवार, वळसे पाटलांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, दोघा नेत्यांकडून एका वाक्यात ‘विषय कट!’