साताऱ्यावर दु:खाचा डोंगर, तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळल्या, अनेक संसार उद्ध्वस्त, कुठे किती मृत्यू?

| Updated on: Jul 23, 2021 | 6:53 PM

सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी दोन गावांमध्ये तर प्रचंड भीषण परिस्थिती आहे.

साताऱ्यावर दु:खाचा डोंगर, तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळल्या, अनेक संसार उद्ध्वस्त, कुठे किती मृत्यू?
आंबेघरच्या गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
Follow us on

सातारा : महाराष्ट्रावर मुसळधार पावासामुळे मोठं संकट ओढावलं आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये दरड कोसळल्याच्या धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशा घटना समोर आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी दोन गावांमध्ये तर प्रचंड भीषण परिस्थिती आहे. या गावांमधील 12 ते 14 माणसं अद्यापही बेपत्ता आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत किती जणांना सुखरुप बाहेर काढलं, किती मृतदेह आढळले याबाबत प्रशासनाकडूनही अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

फक्त सातारा जिल्ह्यात सहा ठिकाणी दरड कोसळल्या

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक सहा वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे येथे दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी तीन ठिकाणी जिवीतहानी झाल्याची माहिती आहे. आंबेघर गावात तर प्रचंड भयानक घटना घडलीय. आंबेघर गावातील तब्बल 14 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मिरगावात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फक्त पाटण तालुक्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कोंडवळी आणि मोजेझोर इथेही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणातील दुर्घटनेत आतापर्यंत एकूण दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आंबेघर गावातील दुर्घटनेचा थरार

आंबेघरमध्ये काल (22 जुलै) दिवसभर मुसळधार पाऊस पडला. रात्रीदेखील पाऊस सुरुच होता. आंबेघरचे गावकरी रात्री गाढ झोपेत होते. या गावकऱ्यांना पुढे नियतीने काय वाढून ठेवलंय याची काहीच कल्पना नव्हती. दरवर्षीप्रमाणे पाऊस पडतोय. त्यामुळे अशा दुर्घटनेचा विचार कुणाच्याही मनात आला नव्हता. पण मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अनपेक्षित अशी मोठी दुर्घटना घडली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काही घरांवर डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत घरे दबली आणि अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला.

दरड कोसळल्यानंतरची परिस्थिती

दरड कोसळल्यामुळे गावात एकच गदारोळ झाला. दुसरीकडे पाऊस प्रचंड पडत होता. त्यामुळे डोळ्यादेखत आपली माणसं दरडीखाली दबली गेलीय पण त्यांना वाचवायचं कसं, काय कारयचं? या विचारांनी गावातील नागरिकांचा जीव तुटत होता. मात्र, अशाही परिस्थितीत गावातील काही तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. पण त्यांच्याकडून एवढामोठा ढिगारा दूर कसा सारला जाणार? असा प्रश्न होता. कारण घरांवर मोठ्या प्रमाणात माती आणि मोठमोठी दगडं होती. अखेर प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. पण मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात व्यत्यय येत होता. याशिवाय माती आणि दगडं मोठमोठ्या जेसीबीशिवाय बाजूला सारता येणार नव्हतं. पण त्या भागात परिस्थिती इतकी भीषण आहे की घटनास्थळी जेसीबी जाण्यासाठी व्यवस्था नाही, अशी माहिती एका स्थानिकाने दिलीय. बचावकार्य अद्यापही सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अद्यापही 15 ते 16 जण दबल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर

ज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

मध्यरात्री 2 वाजता डोंगराचा भाग कोसळला, घरं दबली, 12 मृत्यू, साताऱ्याच्या संपूर्ण घटनेचा थरार

Raigad Satara landslide live : महाराष्ट्रावर दरडींचा घाला, आतापर्यंत 89 बळी, कुठे किती मृत्यू?