पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाला वंचितचंही आव्हान; वंचितच्या उमेदवारामुळे मतविभागणी होणार?

| Updated on: Jan 27, 2023 | 8:39 AM

छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजपा नेत्यांशी बोलणी सुरू आहे. त्यामुळे भाजप आम्हाला पाठिंबा देईल, असं स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितलं.

पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाला वंचितचंही आव्हान; वंचितच्या उमेदवारामुळे मतविभागणी होणार?
vanchit bahujan aghadi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव: नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित पाटील यांच्या थेट लढत होणार असल्याचं सांगितलं जात असतानाच या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत उमेदवार दिला आहे. वंचितचा उमेदवार हा एकमेव राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. बाकी सर्व उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे वंचितने या निवडणुकीत हवा निर्माण केल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतरही या निवडणुकीत वंचितची उमेदवारी कायम आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात वंचित आघाडीने रतन बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. रतन बनसोडे हे एकमेव पक्षाचे उमेदवार आहेत. सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. तर शुभांगी पाटील या आधी अपक्ष उमेदवार होत्या. परंतु आता त्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होत असल्याचं दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली. त्यानंतरही पदवीधरमधील वंचितची उमेदवारी कायम आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेसोबत युती झाल्याने रतन बनसोडे यांना मतदारसंघात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असा दावा वंचित आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी केला आहे.

पाटील यांना फटका बसणार?

एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वंचित सोबत युती केली खरी पण युती होण्याआधी वंचितकडून अधिकृत उमेदवार देण्यात आल्याने ही निवडणूक लढण्याचा निर्णय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे मात्र वंचित आणि महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार असल्याने याचा फटका शुभांगी पाटील यांना बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

पाठिंबा आम्हालाच मिळेल

दरम्यान, आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देखील नाशिक पदवीधर मतदारसंघात सस्पेन्स कायम आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना देखील भाजप आणि शिंदे गटाचा अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर झालेला नाही. भाजप आणि शिंदे गटाचा मलाच पाठिंबा मिळेल, असा दावा स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे.

फडणवीस, संभाजीराजे उद्या नाशिकमध्ये

छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजपा नेत्यांशी बोलणी सुरू आहे. त्यामुळे भाजप आम्हाला पाठिंबा देईल, असं स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितलं. स्वराज संघटनेच्या दाव्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देखील नवीन ट्विस्ट आला आहे.

उद्या देवेंद्र फडणवीस आणि संभाजी महाराज नाशिक दौऱ्यावर आहेत. येणाऱ्या काही तासात नाशिक पदवीधर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील, असा दावाही स्वराज संघटनेने केला आहे.