
नगर : अकोल्यानंतर शेगावमध्येही जोरदार राडा झाला आहे. दोन गटात तुफान हाणामारी झाल्यानंतर अकोल्यात तणाव निर्माण झाला आहे. एका मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेले लोक चिडले आणि त्यांनीही दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तापल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेनंतर शेगावमध्ये चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं.
नगरच्या शेगावमध्ये काल मिरवणूक सुरू होती. त्यावेळी अचानक दगडफेक झाली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. मिरवणुकीतील लोकांनीही संतप्त होऊन दगडफेकीस सुरुवात केली. यावेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात आली. इतकेच नव्हे तर दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली. जमाव प्रचंड संतप्त झाला होता. यावेळी जमावाने अंधाधूंदपणे दगडफेक सुरू केल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली होती.
या राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक जमाव ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमाव पांगला. पोलिसांनी पुन्हा अनुचित प्रकार घडून नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. सध्या शेगावमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे.
शनिवारी रात्री अकोल्यात झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र, तरीही काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने अकोल्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरविल्या जाऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल रात्री अकोला येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.
ही घटना पूर्वनियोजित होती. या राड्यात वाहनांचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी दंगलीत मृत झालेल्या व्यकतीच्या कुटुंबाला भेट देऊन त्याचे सांत्वन केले. तसेच मृतकाच्या कुटुंबाला चार लाखांची मदत देणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी जाहीर केल आहे.