रामदास कदम यांनी लावलेल्या फोटोवरून काय वाटते; भास्कर जाधव यांनी सांगितलं

काहीही झालं तरी उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांना फोन करणार नाहीत. आमच्याकडं ये असं म्हणणार नाही. पण, रामदास कदम आले तरी उद्धव ठाकरे त्यांना जवळ करणार नाही.

रामदास कदम यांनी लावलेल्या फोटोवरून काय वाटते; भास्कर जाधव यांनी सांगितलं
भास्कर जाधव
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 05, 2023 | 2:30 PM

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांची सायंकाळी रत्नागिरीतील खेड येथे सभा होत आहे. यानिमित्त स्थानिक आमदार, खासदार सक्रिय झालेत. रामदास कदम यांचेही बॅनर झळकत आहेत. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आघात झाला. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे यांची सभा होत आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार. कोणती भूमिका घेणार याकडं लक्ष राहील. पक्षप्रमुख येत आहेत. आमदार, खासदार भविष्यातील राजकीय वातावरण, यावर चर्चा होणार आहे. रामदास कदम यांनी फोटो लावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतील. साहेब काहीही बोललो असलो तरी मला पश्चाताप झालाय. तुम्ही मला फोन केल्यास मीसुद्धा तुमच्याकडे यायला तयार आहे. अशा आशयाचे फोटो दिसत असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. काहीही झालं तरी उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांना फोन करणार नाहीत. आमच्याकडं ये असं म्हणणार नाही. पण, रामदास कदम आले तरी उद्धव ठाकरे त्यांना जवळ करणार नाही.

स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग

ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांच्या भावना काल आपण पाहिल्या. विद्यमान केंद्र सरकार स्वायत्त संस्था मोडीत काढण्यासाठी निघालेलं आहे. त्यामध्ये न्यायालय आहेत. निवडणूक आयोग आहे. सीबीआय, ईडी या सर्व संस्था केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांना संपवण्यासाठी काम करतात की, काय, अशी अनेक उदाहरणं देशासमोर आली आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. हे संविधानाला मारक आहे. हे घटनात्मक कार्यपद्धतीला पोषक नाही, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.

जागृतीसाठी लिहिलेलं पत्र

विरोधी पक्ष संपवणं म्हणजे लोकशाही दुबळी करणं होय. लोकशाही वाचवायची असेल तर पंतप्रधानांनी अशाप्रकारचं काम थांबवावं. अशा अर्थाचं ते पत्र आहे, असं मला वाटत असल्याचंही भास्कर जाधव यांनी सांगितलं. या पत्रात ९ नेत्यांच्या सह्या आहेत. याव्यतिरिक्त अन्य पक्ष आहेत. केवळ हे नऊच पक्ष विरोधात आहेत. अशातला भाग नाही. कोण्या एका पक्षाची सही नाही, याचा अर्थ त्यांना डावललं किंवा त्यांचा विरोध नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. जागृती करण्याकरिता म्हणून लिहिलेलं हे पत्र आहे. त्यामुळं त्यात काँग्रेसची सही नाही. तसंच अन्य पक्षादेखील सही नाही, असंही जाधव यांनी म्हंटलं.