दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी सवलत देणार?, काय आहे योजना

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५,७६४ वाहने असून कर्मचाऱ्यांची संख्या ८६,३१७ इतकी आहे. महामंडळाची राज्यभरात ५९८ बसस्थानके असून ३,२२७ मार्गस्थ निवारे आहेत.

दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी सवलत देणार?, काय आहे योजना
| Updated on: Jun 23, 2025 | 3:51 PM

एसटी महामंडळाने आपल्या कारभाराची श्वेत पत्रिका काढली आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा १० हजार कोटी रुपयांच्यावर पोहचला आहे. त्यातच एसटीची शासनाकडे सात हजार कोटींची देणी थकली आहेत. एसटीची श्वेतपत्रिका म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका एसटी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी राज्य सरकारने अधिक अर्थसहाय्य देण्याची मागणी एसटी युनियनच्या नेत्यांनी केली आहे.

एसटी महामंडळाची श्वेत पत्रिका काढण्यात आली आहे. या एसटी महामंडळाच्या खर्च आणि उत्पन्नाचा जमाखर्च मांडण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ५३०० इलेक्ट्रीक बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. सवलतधारी प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ( NCMC ) योजना राबवण्यात येणार आहे. तिकीटांसाठी इटीआयएम, ओआरएस प्रकल्प राबवणे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत. तसेच लांबचा प्रवास करणाऱ्या विना सवलतधारी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याचीही योजना एसटी महामंडळाच्या विचाराधीन असल्याचे या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.

उत्पन्नात वाढ करणाऱ्या उपाययोजना

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दरवर्षी ५००० हजार नवीन बसेसचा समावेश करणे

महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्वावरील हायटेक व्होल्वो बसेसचा समावेश करणे

महामंडळाच्या जागांवर इंधर पुरवठादार कंपन्यांकडून महसुली भागीदारी तत्वावर खाजगी वाहनांसाठी किरकोळ डिझेल आणि पेट्रोल पंप सुरु करणे

महामंडळाच्या जागांचा बीओटी-पीपीपी तत्वावर विकास करणे

महामंडळाच्या ताफ्यात ५००० एलएनजी इंधनाच्या बसेसचा समावेश करणे

महामंडळाच्या ताफ्यात १००० सीएनजी इंधनाच्या बसेसचा अंतर्भाव करणे

एसटीची श्वेतपत्रिका नेमकी काय ?

एसटीच्या श्वेतपत्रिकेत गेल्या ४५ वर्षातील आकडेवारीचा आढावा घेतला आहे. २०१८-१९मध्ये ४६०३ कोटी रुपये तोटा होता. तो मार्च २०२३ अखेर १०३२४ कोटी रुपये तोटा झालेला आहे. २०२४-२५ मध्ये १२१७ कोटी रूपयांचा तोटा अपेक्षित आहे राज्य सरकारने २००१ पासून ६३५३ कोटी रुपयांची भांडवली मदत केली आहे. २०२० ते २०२३ या काळात ४७०८ कोटींची महसुली मदत सरकारने केली आहे. वैधानिक स्वरूपाची देणी ३२९७ कोटी रुपयांची देणी बाकी आहेत.

एसटीला तोटा का होतो ?

तोट्याच्या कारणामध्ये बसेस कमी असणे, तोट्याची फे-या, अनियमित भाडेवाढ, खाजगी वाहतूक याचा समावेश आहे. दरवर्षी ५ हजार बसेस ताफ्यात आणण्याचे एसटीचे लक्ष्य आहे. आज एसटीचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाची श्वेत पत्रिका काढली.  परिवहन विभागातील आर्थिक तोटा आणि खर्च तसेच उत्पन्नाचा अंदाज याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनीच श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते.  ⁠त्यानुसार श्वेतपत्रिका काढण्यात आली असून यांवर स्वतः परीवहन मंत्री प्रताप सरनाईक पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.  महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आणि नियोजनासाठी ही श्वेतपत्रिका महत्त्वाची ठरणार आहे.  ⁠परिवहन मंत्री तसेच महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते.

 एसटीचा संचित तोटा सुमारे १० हजार कोटी

एसटी महामंडळाचा संचित तोटा हा १० हजार कोटी रुपयांवर पोहचला आहे.  महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकांचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते. ⁠कर्मचाऱ्यांची देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे. महामंडळाला इंधन, वस्तु व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणीही द्यायची आहेत.

वेळोवेळी नविन बसेस घेतल्या असत्या तर …

वेळोवेळी नविन बसेस घेतल्या असत्या तर एसटीवर अशी वेळ आली नसती. ४५ वर्षात एसटीला ८ वर्षे काही प्रमाणात फायदा झाला आहे. सर्व एसटी डेपो, स्टँडची  स्वच्छता केली जाणार असून बसची स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई करण्यासाठी आम्ही निविदा काढत आहोत. जुन्या बसेस येत्या ३-४ वर्षात आम्ही भंगारात काढणार आहोत. जाहीरातीचे उत्पन्न २२ कोटींवरून १०० कोटींवर नेणार आहोत. सर्व डेपोंवर आमचे पेट्रोल पंप आहेत. हे पंप आम्ही प्रायोगिक तत्वावर लोकांसाठी खुले करणार आहोत. सर्व एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे. अडीच तीन वर्षात एसटी महामंडळात बदल झालेला दिसेल असा विश्वास मंत्री  प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

“शिळ्या कढीला ऊत”

एसटी महामंडळाची सोंमवारी  प्रसिद्ध झालेली श्वेत पत्रिका म्हणजे “शिळ्या कढीला ऊत”  आहे. सांख्यिकी विभागाने संकलित केलेली माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती दर विधिमंडळाच्या अधिवेशनात सर्व संबंधिताना देण्यात येते. जो पर्यंत ७ हजार कोटी रुपयांच्या थकीत देण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात येत नाही. तो पर्यंत काहीही उपयोग नाही अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.