संगम स्टीलने देवळीमध्ये 21 दिवसांत उभारला ऑक्सिजन प्लान्ट, वैद्यकीय वापरासाठी मोफत ऑक्सिजन

| Updated on: May 17, 2021 | 7:54 PM

सरकारच्या आवाहनला प्रतिसाद देत वर्ध्यातील देवळी इथं एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमीटेडच्या (संगम स्टील) वतीने 'संगम ओ टू' हा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला आहे.

संगम स्टीलने देवळीमध्ये 21 दिवसांत उभारला ऑक्सिजन प्लान्ट, वैद्यकीय वापरासाठी मोफत ऑक्सिजन
संगम स्टीलने देवळीमध्ये उभारला ऑक्सिजन प्लान्ट
Follow us on

वर्धा : कोरोनाचा या संकट काळात आरोग्यव्यवस्था कोलमडली असताना ऑक्सिजनसाठी मारामार होतेय. ऑक्सिजनअभावी अनेकांचे प्राणही गेले. ऑक्सिजनची कमतरता पाहता शासनानं ऑक्सिजन स्वावलंबन मिशन सुरु केलं आहे. सरकारच्या या आवाहनला प्रतिसाद देत वर्ध्यातील देवळी इथं एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमीटेडच्या (संगम स्टील) वतीने ‘संगम ओ टू’ हा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात निर्माण होणारा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी मोफत दिला जाणार आहे. या प्रकल्पाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. (Sangam Steel builds oxygen plant in Deoli in 21 days)

देवळी इथं एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमीटेडनं ऑक्सिजन स्वावलंबन मिशन अंतर्गत ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्याचा निश्चय केला होता. कंपनीनं त्यासाठी बंगळुरु इथल्या ऑक्सिजन प्लान्ट तयार करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. तिथे नायजेरीयाला जाण्यासाठी एक प्रकल्प तयार होता. संबंधितांशी संपर्क साधून कंपनीनं विदेशात जाणारा हा प्लान्ट देवळीसाठी मिळवला. अवघ्या २१ दिवसांत कंपनीन प्लान्टची उभारणी करत हवेतून ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. दररोज 500 ऑक्सिजन सिलिंडर निर्मितीची या प्लान्टची क्षमता आहे.

वैद्यकीय वापरासाठी मोफत ऑक्सिजन

वर्धा जिल्ह्याला प्रथम प्राधान्य देत कंपनीकडून प्रकल्पात तयार होणारा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी निशुल्क दिला जाणार आहे अशी माहिती (संगम स्टील) एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमीटेडचे संचालक योगेश मानधनी यांनी दिली आहे.

कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा

ऑक्सिजन प्रकल्पाच्या निर्मितीसाठी आमदार रणजित कांबळे यांनीही मोठे प्रयत्न केले. आमदार कांबळे यांच्या मार्फत देवळी आणि पुलगाव इथं शासनामार्फत ऑक्सिजन बेड असलेले कोव्हिडं सेंटर सुरू केले जाणार आहे. या कोव्हिडं सेंटरला याच प्रकल्पातून ऑक्सिजनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. प्रकल्पातील पहिली ऑक्सिजन सिलिंडरची खेप आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं. यावेळी गडकरी यांनी ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होण्याची गरज व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 12 रुग्ण दगावले

मोठी बातमी: कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

Sangam Steel builds oxygen plant in Deoli in 21 days