
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये गुरुवारी एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. एका हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं, दरम्यान मृत्यूपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या तळहतावर एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये तिने निलंबीत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, गोपाळ बदने याने आपल्यावर अत्याचार केला तर प्रशांत बनकर याच्याकडून आपला मानसिक आणि शारीरीक छळ सुरू होता असा आरोप या महिला डॉक्टरने केला आहे.
दरम्यान या प्रकरणावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रकरण समोर येताच गोपाळ बदने याचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता, अखेर तो पोलिसांना शरण आला आहे, तर या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेल्या प्रशांत बनकर याला पोलिसांनी आधीच अटक केलं होतं. गोपाळ बदने याला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान आता या प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या उद्या फलटणला जाणार आहेत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील तपासी अधिकारी तसेच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख यांच्यासोबत उद्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची बैठक होणार आहे. या आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा उद्या रूपाली चाकणकर घेणार आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील फलटणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे, या प्रकरणात तिने पीएसआय गोपळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिसांवर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोनही आरोपींना अटक करण्यात आलं असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.