‘मोदीजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष..’, प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल

ऑपरेश सिंदूरनंतर भाजपच्या वतीनं देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे, यावर प्रश्न उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मोदीजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष.., प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल
| Updated on: May 19, 2025 | 4:44 PM

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली. भारतान ऑपरेश सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतानं हे हल्ले परतून लावले, प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला, त्यानंतर अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली.

युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता देशभरात भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. ‘ मोदीजी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष देशाच्या सुरक्षेवर आहे की प्रचारमध्ये?’ असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

‘दरम्यान अजून त्या महिलांना न्याय मिळालेला नाही, ज्यांच्या पतींची पहलगाम हल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली, एक महिना झाला, या हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? आणि तुम्ही उत्सव साजरा करत आहात?’ असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे, ‘युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा, युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्यात अशी विनंती अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार देखील मानले आहेत. मात्र आता या पत्रामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.