परभणीत कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर बाळंतीण महिला, लहान मुलींना मारहाण…प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप

परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आयोग, एससी-एसटी आयोग आणि मानवी हक्क आयोगाच्या अहवालाकडे लक्ष घालावे. परभणी घटनेबाबत पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षकांनी खरी माहिती सरकारला दिली का? त्याचा तपास करावा

परभणीत कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर बाळंतीण महिला, लहान मुलींना मारहाण...प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप
प्रकाश आंबेडकर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 20, 2024 | 8:26 PM

परभणी आणि बीड घटनेवरुन हिवाळी अधिवेशात राज्य सरकार अडचणीत आले आहे. परभणीमध्ये झालेल्या जाळपोळीनंतर या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. कोंबिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घर तोडण्यात आली. तर काही जणांना घरात शिरून मारहाण करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर बाळंतीण महिला आणि लहान मुलींना मारहाण झाली असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या घटनेची सरकारने पोलिसांकडून नाही तर इतर कमिटींकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या घटनेबाबत सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य खरे असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आयोग, एससी-एसटी आयोग आणि मानवी हक्क आयोगाच्या अहवालाकडे लक्ष घालावे. परभणी घटनेबाबत पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षकांनी खरी माहिती सरकारला दिली का? त्याचा तपास करावा आणि योग्य कारवाई करावी. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 करोड रुपयांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावी, ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात जे वक्तव्य केले होते, त्यामध्ये तथ्य आहे. परभणीतील कोबिंग ऑपरेशनबाबत मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यांना विनंती केली पोलिसांकडून होणारा अमानुष लाठीहल्ला थांबवण्यात यावा. कोंबिंग ऑपरेशन थांबवावे. त्यानंतर मला कॉनकॉलमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयजी यांचा कॉल झाला.

मुख्यमंत्री काय म्हणाले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले होते की, मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. त्यांनी परभणीत कोंबिंग ऑपरेशन राबवले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर मी तत्काळ पोलिसांना विचारले. परभणीत कसले ऑपरेशन सुरू आहे. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, जाळपोळीच्या घटनेमध्ये जे लोक व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्यांना पकडले जात आहे. त्यानंतर आयजी, माझे आणि प्रकाश आंबेडकर यांचे एकत्रित बोलणे झाले. त्यानंतर कोबिंग ऑपरेशन थांबले. त्यानंतर कोणालाही अटकही केलेली नाही.