ठाकरे बधूंची युती होताच राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार फुटणार, कोण आहेत प्रकाश महाजन?

माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, १५ जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ठाकरे बधूंची युती होताच राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार फुटणार, कोण आहेत प्रकाश महाजन?
prakash mahajan
| Updated on: Dec 26, 2025 | 12:36 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. येत्या १५ जानेवारीला मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षात इमकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. त्यातच आता माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ते लवकरच शिवसेनेत सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला रामराम केला होता. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत पक्ष सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले होते. मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे. याच कारणामुळे आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी राज ठाकरेंना घाबरत नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले होते. यानंतर आता त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावरुन ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रकाश महाजन कोण?

प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन आणि ज्येष्ठ नेते पांडुरंग महाजन यांचे धाकटे बंधू आहेत. महाजन कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असली, तरी प्रकाश महाजन यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा राजकीय प्रवास विविध टप्प्यांतून आणि पक्षांतून झाला आहे.

राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली, तेव्हा प्रकाश महाजन त्यांच्या सुरुवातीच्या शिलेदारांपैकी एक होते. त्यांनी मनसेमध्ये सरचिटणीस म्हणूनही काम केले. काही काळानंतर मतभेद झाल्यामुळे त्यांनी मनसे सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला. तिथे त्यांनी प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू लावून धरली. शिवसेनेत काही काळ राहिल्यानंतर ते पुन्हा राज ठाकरेंच्या मनसेमध्ये परतले. टीव्हीवरील डिबेट्स आणि सभांमध्ये ते मनसेची आक्रमक बाजू मांडण्यासाठी ओळखले जात असतं.

प्रकाश महाजन यांचा मूळ प्रभाव छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि बीड जिल्ह्यात आहे. मराठवाड्यातील प्रश्नांवर ते नेहमीच सडेतोडपणे बोलतात. त्यांच्याकडे एक उत्तम संघटक म्हणून पाहिले जाते.

आता सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांनी जेव्हा मनसे सोडली, तेव्हा त्यांनी नारायण राणे यांच्याकडून मिळत असलेल्या धमक्यांचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनी वेळोवेळी आपले बंधू प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे आणि त्याबाबत भाजप सरकारला प्रश्नही विचारले आहेत. अलीकडेच मनसे सोडताना त्यांनी पक्ष हिंदुत्वापासून दूर जात आहे अशी टीका केली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे आता ते नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल चर्चा रंगली आहे.