रॅपिडो विरोधात रिक्षा चालकांकडून पुन्हा संपाची हाक; परिवहन मंत्री सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

रॅपिडो विरोधात रिक्षा चालकांकडून पुन्हा संपाची हाक देण्यात आली आहे. परंतु रिक्षा चालक संघटना पुन्हा संप करणार नाही, असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांनी संघटनेला महत्वाचं आश्वासन दिलं.

रॅपिडो विरोधात रिक्षा चालकांकडून पुन्हा संपाची हाक; परिवहन मंत्री सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 12:49 PM

रॅपिडो, ओला, उबर विरोधात रिक्षा चालकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे दरवाढीसहीत रॅपिडोवर बंदी घालण्याची मागणी रिक्षा चालकांकडून केली जात आहे.  याच मागणीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांनी पुन्हा 1 डिसेंबर रोजी संपाची हाक दिली आहे. रिक्षा चालकांच्या मागणीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिली प्रतिक्रियाा दिली आहे. रिक्षा चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सरनाईक म्हणले, ‘रिक्षाचालकांच्या संपाच्या संदर्भात काही प्रतिनिधी मला भेटण्यासाठी येणार आहेत.एक डिसेंबरपासून होणारा प्रस्तावित संप होणार नाही, असा मला विश्वास आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री म्हणून माझी भूमिका सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांना देण्यात येणार आहेत. रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चेच्या माध्यमातून योग्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल’.

Loading...

राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीवर सरनाईक यांनी भाष्य केलं. सरनाईक म्हणाले,  आगामी काळात राज्यात मोठे पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या या महिन्यापुरता आणि पुढील महिन्यापर्यंत पाणीसाठा उपलब्ध असला, तरी आतापासूनच पाण्याचे नियोजन आणि काटकसर करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक महानगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद यांनी पाणी बचतीच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. राज्यात सर्वात कमी पाणीसाठा धाराशिव जिल्ह्यात असून, उपलब्ध माहितीनुसार तेथील पाणीसाठा केवळ ५.३४ टक्के आहे.  पुढील आठ ते नऊ महिने अत्यंत काटकसरीने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यंदा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वप्रथम पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याला सरकारचे प्राधान्य राहील. यासाठी राज्य सरकार विशेष उपाययोजना आखत असून, आगामी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महत्त्वपूर्ण घोषणा करतील. धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा नियोजनाबाबत उद्या मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीतही बैठक होणार आहे. वर्षभरातील पाणीसाठा आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला जाईल.

शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीवर सरनाईक म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात महायुती सरकार कुठेही कमी पडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः राज्यभर दौरे करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सरकारच्या माध्यमातून मदत मिळेलच; मात्र शिवसेनेच्या माध्यमातूनही कोणताही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. छोट्या-छोट्या गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे यावर भर दिला जात आहे. दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या उभारणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे तसेच अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत. प्रत्येक जिल्हाप्रमुख आणि पालकमंत्री गावागावांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुढील आठ ते नऊ महिने शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातूनही शक्य ती सर्व भरीव मदत केली जाईल. शेतकऱ्यांसाठी आणखी काही विशेष उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. येत्या २६ तारखेला मी शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना जाहीर करणार आहे.

रोहित पवारांवर म्हणाले, ‘ पवार कुटुंबातील आणि पक्षातील प्रमुख व्यक्तींकडूनही त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका मांडणे योग्य नाही.  बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यापूर्वी सरकारशी चर्चा करावी. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे’.  संजय राऊतांच्या आरोपावर ते म्हणले,  संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य दिसत नाही. मला वाटते, संजय राऊत यांनी आता राजकीय वक्तव्यांपेक्षा ज्योतिषाची भूमिका स्वीकारावी. रस्त्यावर पोपटाच्या माध्यमातून भविष्य सांगणारे भविष्यकार असतात, त्यांच्याप्रमाणे संजय राऊत यांनीही दोन-चार पोपट घेऊन भविष्य सांगावे..हल्ली ते दररोज सकाळी भविष्यवाणी करताना दिसतात. पोपटाने चिठ्ठी उचलावी आणि त्यातून भविष्य सांगावे, त्याच पद्धतीने संजय राऊत रोज काहीतरी आरोप करत असतात. मात्र त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसते.  केवळ प्रसिद्धीसाठी सकाळी-सकाळी पोपटपंची करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या वक्तव्यांवर लगाम घालावा’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us