
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनामंध्ये वाढ होत आहे. मारहाण, खून, दरोडा, हत्या, तोडफोड, चोरी यांसारख्या गुन्ह्यांची पोलिसात नोद होताना दिसत आहे. त्यातच आता सोलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोलापुरातील तुळजाई नगर भागात एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या महिलेला तीन ते चार महिलांनी मारहाण केल्याचे बोललं जात आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सोलापुरात एका गर्भवती महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. शिल्पा कृष्णा मिस्किन (२४) असे मारहाण झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. तिला पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
या घटनेबाबत शिल्पा यांची सासू प्रभावती मिस्कीन यांनी सांगितले की, माझा मुलगा एका कारखान्यात कामाला आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेली एक मुलगी सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसांपूर्वी त्या दोघ एकमेकांशी बोलत असताना मुलीच्या कुटुंबियांनी पाहिले. त्यांच्या कुटुंबियांना याच गोष्टीचा राग आला. त्या मुलीच्या नातेवाईकांनी माझ्या घरी येऊन माझा मुलगा आणि सूनेला शिवीगाळ केली. त्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. गर्भवती असूनही तिच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर इजा होईल अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली. असे प्रभावती मिस्कीन म्हणाल्या.
आमची काही चूक नसताना त्यांनी आम्हाला मारहाण केली. इतकेच नव्हे तर, आम्हाला मारहाण करून पोलीस स्टेशनमध्ये आमच्या नावाची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. आमच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. पोलिसांनी आणि माध्यमांनी याची पडताळणी करावी,” असे आवाहन प्रभावती मिस्कीन यांनी केले आहे.
या मारहाणीत जखमी झालेल्या शिल्पा यांच्यावर सुरुवातीला सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या महिलांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. या महिलेच्या पतीचे आणि एका मुलीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या घरच्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सोलापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गर्भवती महिलेवरील या अमानुष हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. लवकरच आरोपींना अटक होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.