भाविकांसाठी महत्त्वाची बातमी ! त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दोन दिवस बंद राहणार
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरू होत आहे. 31 ऑक्टोबर रोजी रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ येथे हा सोहळा पार पडेल. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 30 व 31 ऑक्टोबर रोजी भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 42 तासांसाठी मंदिर बंद राहील.

सर्व भाविक ज्याची आतुरतेने वाट पहात होते, त्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दर 12 वर्षांनी भरणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सोहळ्याला लौकरच सुरुवात होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे. उद्या, म्हणजेच शनिवार 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपतींसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आदेश जारी केले असून, त्यानुसार, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. जवळपास 42 तास मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद असेल. केवळ स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाकडून पास मिळालेल्या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. राष्ट्रपतींचा दौरा, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
सुरक्षा व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि देवस्थान ट्रस्टच्या सचिवांच्या अभिप्रायानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या कालावधीत त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक रहिवासी आणि जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत पास मिळालेल्या व्यक्तींनाच मंदिरात दर्शन घेता येणार आहे. इतर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या ध्वजारोहण सोहळा
2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता अधिकृत सुरुवात होत आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नाशिकमधील रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. तर दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी कुशावर्त तीर्थ (राम तीर्थ) याठिकाणी ध्वजस्तंभ पूजन पार पडेल. या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन केले जात आहे.