‘आई, सासरी खूप त्रास होतोय गं…’ आईला फोन, त्रासाची कहाणी सांगितली अन्…; त्याच रात्री इंजिनियर विवाहितेचा मृत्यू
Pune Dowry Case: पुण्यात २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सासरच्यांकडून हुंड्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीमुळे २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. उंड्री-वडाचीवाडी परिसरात २३ वर्षीय विवाहित IT इंजिनियरचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वैष्णवी प्रविण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरच्यांनी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोने दिले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतरही चारचाकी वाहन खरेदीसाठी ५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. विवाहानंतर वैष्णवी काही काळ सासरी राहिली. त्यानंतर नोकरीनिमित्त ती बंगळुरू येथे गेली होती.
जूनअखेरीस ती पुन्हा पुण्यात सासरी आली होती. ती घरूनच IT कंपनीचे काम करीत होती. या काळात पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. २४ सप्टेंबर रोजी रात्री वैष्णवीने आईशी दूरध्वनीवर संपर्क साधून सासरी होत असलेल्या त्रासाबाबत सांगितल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्याच रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पतीने माहेरच्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
त्यानंतर वैष्णवीशी संपर्क होऊ न शकल्याने तिचे आई-वडील पुण्यात आले असता घटना समोर आली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती ओंकार संजय घिसरे याच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील आरोपांबाबत अधिक स्पष्टता होणार आहे.