लाडक्या बैलाने जगाचा निरोप घेतला, जीवापाड प्रेम करणाऱ्या शेतकर्याच्या कृतीने डोळ्यात पाणी येईल
शेतकऱ्याच्या लाडक्या बैलाने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर जीवापाड प्रेम करणाऱ्या शेतकर्याच्या कृतीने डोळ्यात पाणी येईल. या शेतकऱ्याची भोर तालुक्यात चर्चा होत आहे.

शेतकरी आणि बैलाचं नात सर्वांनाच ठाकऊ. बळीराजा त्याच्या मुक्या प्राण्याला जीवापाड जपतो. अनेक शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे बैलाला वाढवतात. शेतकरी बांधव स्वत: जेवण करण्याआधी बैलाला चाऱ्याचा विचार करतात. त्यामुळे बैल आणि शेतकऱ्याचं नातं सर्वश्रुत आहे. पुण्यातून हेच अतुट नातं समोर आलं आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील उत्रौली गावातील शेकऱ्याच्या प्रेमळ कृतीने प्रेमाने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या शेतकऱ्याने कृतीतून शाहीर नावाच्या बैलावर दाखवलेल्या प्रेमाची संपूर्ण राज्यभरात चर्चा होत आहे.
पोटच्या पोराप्रमाणे वाढविलेल्या लाडक्या बैलाच्या निधनानंतर त्याची आठवण म्हणून थेट घराच्या प्रवेश द्वारासमोर अंगणात शाहीर नावाच्या बैलाचा हुबेहूब पुतळा बसवला आहे. उत्रौली गावातील शेतकरी आणि गाडामालक असलेले अजय विठ्ठल शिवतरे यांनी शाहीर बैलाच्या मृत्यूनंतर पुणे,सातारा जिल्ह्यातील गाडामालक, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या साक्षीने विधीवत पूजा केली. त्यानंतर या शेतकऱ्याने शाहीर बैलाचा पुतळा बसविलाय. शेतकरी घरातील सदस्यांप्रमाणे बैलाची काळजी घेतात. शेतकरी हा बैलांच्या भरवशावर शेती करतात. पण त्याचा बैलाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही..याचीच प्रचिती आणणारा हा प्रसंग उत्रौली गावात घडलाय.
घरातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून विधिवत पूजा करून तेराव्याला संपूर्ण गावाला, नातेवाईकांना जेवण घातलं.. त्यानंतर शर्यतीतील १३ बैलांचे औक्षण करुन पुरणपोळीचा नैवैद्य भरविण्यात आला. त्यानंतर बैलगाडा मालकांचा सत्कार केला. पुढे सर्वांच्या साक्षीने या शाहीर बैलाचा घराच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर पुतळा बसवलाय. त्यामुळे भोर तालुक्यात सध्या शेतकरी अजय विठ्ठल शिवतरे आणि त्यांच्या बैलाच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे. शेतकऱ्याने उपकाराची परतफेड केल्याचं कौतुक गावकरी करू लागले आहेत. घरासमोर पुतळा बांधून शाहीर बैलामुळे जीवनात बदल घडवल्याची भावना व्यक्त करत आहेत. मुक्या प्राण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याच्या कृतीने तुमचंही मन भरून येईल. शेतकऱ्याने बसवलेल्या पुतळ्याचे फोटो काढण्यासाठी गावाबाहेरून उत्रौली गावात येऊ लागले आहेत. बैलावर अपार प्रेम दाखवणाऱ्या अजय शिवतरे शेतकऱ्याची संपूर्ण भोर तालुक्यात चर्चा होऊ लागली आहे.