Dagdusheth ganpati temple : पुण्याचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर स्थलांतरित करा; हिंदू महासभेच्या दवेंची मागणी

दगडूशेठ गणपती मंदिराचा विस्ताराची मागणी आहे. परंतु यावर आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांंना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Dagdusheth ganpati temple : पुण्याचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर स्थलांतरित करा; हिंदू महासभेच्या दवेंची मागणी
Dagdusheth ganpati temple
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 14, 2026 | 1:06 PM

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग होण्याची शक्यता आहे. या मंदिरालगत असलेल्या फरासखाना पोलील ठाण्याची जागा मंदिराच्या विस्तारासाठी हस्तांतरित पुणे पोलिसांनी तत्वत: ना हरकत दिली आहे. परंतु पोलीस ठाण्याची जागा तातडीने रिकामी केली जाणार नाही. त्यासाठी पर्यायी जागेवर पोलीस संकुल उभारण्याची शक्यता आहे. परंतु श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने फरासखाना पोलीस स्टेशनच्या जागेची मागणी केल्यानंतर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक झाले आहेत. हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.

आनंद दवे यांचा आक्षेप

दगडूशेठ गणपती मंदिरासाठी फरासकाना, पोलीस ठाणे, पोलिसांची कार्यालये, आवश्यक सुविधा बुधवार पेठ परिसरात आधुनिक पोलीस संकुलात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या संकुलात दत्त मंदिराजवळ सुमारे नऊ गुंठे जागा घेण्यात आली आहे. नवीन पोलीस संकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच सध्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याची जागा रिकामी मंदिराच्या विस्तारासाठी देण्यात येणार आहे. या मंदिरात दिवसाला जवळपास 50 हजारांहून अधिक भाविक येत असतात, असे सांगितले जाते. परंतु याच मंदिराच्या विस्तारावरून हिंदू महासेभेचे आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.

हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या व्यवस्थापनाचे व्यवस्थापन पुढील शंभर वर्षे करण्याची मागणी केली आहे. शनिवार वाडा,सारसबाग किंवा शाळेचे मैदान या ठिकाणी पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी दवे यांनी केली आहे. मुंबईतील लालबाग गणपती एवढेच दगडूशेठ गणपतीला भाविक येत आहे. तरी देखील ट्रस्ट व्यवस्थापन का करू शकत नाही का, असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान अर्धा तास मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले आहेत. तरी देखील व्यवस्थापनाला योग्य तो पर्याय शोधता आला नाही. कितीही पर्याय शोधले तरी पुढील दहा वर्षात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात गर्दी होणारच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निवेदन देणार आहे, असे दवे यांनी सांगितले.

दवेंच्या मागणीवर ट्रस्टचं स्पष्टीकरण

‘दगडूशेठ मंदिर परिसरात वेळोवेळी ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. पुढील दहा वर्षाचं व्यवस्थापन करण्यापेक्षा 100 वर्षाचे व्यवस्थापन करावं, यासाठी शनिवार वाडा किंवा शाळेचे मैदान याचा पर्याय शोधावा, अशी मागणी दवे यांनी केली. दवे यांच्या मागणीवर ट्रस्टने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट कडून फरासखाना पोलीस स्टेशनची जागेची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासकीय प्रक्रिया असल्याने यावर बोलणं उचित ठरणार नाही’.

हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांकडे काय प्रस्ताव सादर केला होता?

कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी या मंदिरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. पोलिसांकडून काही अटींसह तत्त्वतः ना हरकत देण्यात आली. त्या अटी मान्य करून प्रस्ताव पुन्हा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नवीन पोलीस संकुल उभारल्यानंतर मंदिराच्या विस्तारासाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार आहे. शासनाकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर या प्रक्रियेला पुढील गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्याच्या स्थलांतरासंदर्भात अंतिम निर्णय शासन स्तरावर होणार आहे. शासन जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us