जैन बोर्डींगचा व्यवहार रद्द करा, धंगेकर यांचे पंतप्रधानांना पत्र,अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन

जैन बोर्डींग जमीन खरेदी व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर रोज नवे आरोप करत आहे. आता त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जैन बोर्डींगचा व्यवहार रद्द करा, धंगेकर यांचे पंतप्रधानांना पत्र,अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन
ravindra dhangekar and murlidhar mohol
| Updated on: Oct 25, 2025 | 10:30 PM

प्रकरणात भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी मोहोळ पुण्याचे महापौर असताना महापालिकेची पाटी लावून कोथरुडच्या बिल्डर बढेकर यांची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे असा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

पुण्यातील जैन बोर्डींग व्यवहार प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान उठवणारे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी,यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपण विनंती करीत आहोत असे धंगेकर यांनी म्हटले आहे. २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे असेही धंगेकर यांनी जाहीर केले आहे.

जैन बोर्डींग जमीन खरेदी व्यवहारात भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी रोज नवे आरोप करुन हे प्रकरण लावून धरले आहे. आता या प्रकरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहिले आहे. या संपूर्ण जमीन व्यवहार रद्द करुन या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबर पासून ते हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण पुणेकरांसोबत धरणे आंदोलनात सुरुवात करणार असल्याचे धंगेकर यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

आजपर्यंतच्या गेल्या १८ दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती आणि संस्था या मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहेत. आज मी या पत्रांमध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहे असे रविंद्र धंगेकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

येथे पोस्ट पाहा –

मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी

या पोस्टमध्ये धंगेकर पुढे म्हणतात की जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे आणि देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही चौकशी निपक्ष:पाती होणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या प्रकरणात मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे आपण आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत असेही धंगेकर पुढे म्हणतात.