
महाराष्ट्रातील मोठ्या कार्यकाळानंतर महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात अनेक ठिकाणी विविध युती आघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.
अजित पवार यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीला खास मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीच्या अँकर निखिला म्हात्रे यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती कशी झाली, यामागे राजकीय गणितं कशी मांडली गेली, याबद्दलची सर्व भूमिका स्पष्टपणे मांडली. यावर बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी आणि स्थानिक परिस्थितीनुसार हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
कोणत्याही क्षेत्रात एखाद्या गोष्टीचा कसा अर्थ काढावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेना आणि मनसे हे पण अनेक वर्षे काम करत आहेत. आता बरोबर एकत्र आले आहे. आम्हीही मधल्या काळात वेगळे झाले. नगर पालिकेत कोल्हापुरातही युती झाली होती. आताच नाही झाली. ९० नंतर कधी एका पक्षाचं सरकार आलं नाही. नेहमी कुणाला तरी आघाडी किंवा युती करावी लागली. लोकसभा आणि विधानसभेला आघाडी होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यकर्त्याला मुभा दिली जाते, असे अजित पवार म्हणाले.
एक तर नऊ वर्षाने निवडणूक आली आहे. नऊ वर्ष निवडणूक नाही झाली. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळाली पाहिजे. काही ठिकाणी भाजप शिवसेना युती झाली. काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती झाली तर काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती झाली. त्या त्या ठिकाणची भौगौलिक परिस्थिती पाहून तिथल्या लोकांनी निर्णय घेतला. त्यांना मुभा दिली. लोकांना काय वाटतं माहीत नाही. ते त्या अँगलने का विचार करतात ते माहीत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती करतोय. कोल्हापुरात आधी युती झाली होती, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
जेव्हाही चर्चा केल्यावर कुणाला तरी बरोबर घेतलं पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सूर जुळले पाहिजे. त्यानंतर युतीची गोष्ट पुढे आली. पण शेवटच्या क्षणापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवडमध्ये तर दोन तीन प्रभागात शिंदे सेनेसोबत युती झाली आहे. पण त्याची चर्चा होणार नाही. पण याची चर्चा होईल. अर्थात जनतेला एकत्र येण्याचा अधिकार आहे. इतके वर्ष राष्ट्रवादी म्हणून काम केलं ना. २०२१ नंतर आम्ही वेगळे झालो होतो. पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. मी मघाशी कुणाला तरी सांगितलं की कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. त्यामुळे देश पुढे जात असतो, असे सूचक विधान अजित पवारांनी केले.