मोठी बातमी! मंदार किवळे हल्लाप्रकरणात 6 आरोपींवर सर्वात मोठी कारवाई, पोलिसांनी सगळ्यांना…अवघ्या काही तासात खेळ खल्लास!
मंदार किवळे हल्ला प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई! सहा जण ताब्यात, दोघांचा हल्ल्यात थेट सहभाग; जखमी किवळे यांची प्रकृती स्थिर असल्याची पोलीस आयुक्तांची माहिती.

योगेश बोरसे, पुणे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : पुण्यामधील घटनेने आज राज्यभर खळबळ उडाली आहे. या घटनेची चर्चा देशभर रंगली आहे. आधी गोळीबार नंतर कोयत्याचे वार करुन आरोपी फरार झाले. पण आता या पुणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील 2 जणांचा थेट हल्ल्यात सहभाग असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. मंदार किवळेची प्रकृती आणि तपासाबाबत पोलिसांनी काय सांगितलं ते जाणून घेऊयात.
नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त अमितेशकुमार?
मंदार किवळे हल्ल्याप्रकरणीत आत्तापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये दोन जणांचा थेट हल्ल्यात सहभाग आहे इतर चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल आहे. मंदार किवळे याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू त्याची प्रकृती स्थिर आहे. कोर्टाबाहेरील सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला आहे. जुन्या प्रकरणातून मंदार किवळेवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करत आहे, अशी माहिती अमितेश कुमारांनी दिली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासाठी पोलिसांचे पथकं हे क्राईम ब्रांचसोबत मिळून काम करत आहेत, घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करत आहेत, असं स्पष्ट केलं होतं. त्यासोबतच पोलिसांनी तातडीने तब्बल ८ ते १० पथकं या गुन्ह्याप्रकरणी बनवून कामाला लावल्याची माहितीही दिली होती. पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की, या प्रकरणातील कोणत्याही आरोपींना सोडणार नाही.
दरम्यान, २०२५मध्ये पुण्यातील कात्रज या भागात एक हत्या करण्यात आली होती. ही हत्या होती शुभम चव्हाण नावाच्या व्यक्तीची. याच शुभमच्या हत्येमुळे आज किवळेवर हल्ला झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार बदल्याच्या आगीतून घडला आहे, हे निष्पन्न झालं आहे. पुढील इतर सर्व आरोपी हे कोण आणि त्यांना कधी ताब्यात घेतलं जाणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.