उगीच नाही जगाचा पोशिंदा, माणसं तर जगवतोच पण पाखरांसाठीही ठेवतो, वाचा 81 वर्षाच्या आजीची भूतदया

| Updated on: Jan 30, 2021 | 9:37 PM

इंदापूरच्या 81 वर्षीय आजींचं पक्षांवरील प्रेम बघितल्यावर तर आपलाही ऊर भरुन येईल (81 year old woman reserved one acre of land for birds).

उगीच नाही जगाचा पोशिंदा, माणसं तर जगवतोच पण पाखरांसाठीही ठेवतो, वाचा 81 वर्षाच्या आजीची भूतदया
Follow us on

इंदापूर (पुणे) : एखादी व्यक्ती प्रेरणादायी तेव्हाच ठरते जेव्हा संपूर्ण समाज त्या व्यक्तीच्या कार्यातून काहीतरी चांगला बोध घेतो आणि त्या व्यक्तीचं अनुकरण करतो. समाज अशा व्यक्तीच्या नतमस्तक होतो. इंदापूरच्या 81 वर्षीय आजींचं पक्षांवरील प्रेम बघितल्यावर तर आपलाही ऊर भरुन येईल. या आजीबाईंनी पक्षांसाठी चक्क ज्वारीची एक एकर जमीन राखून ठेवली. त्यांच्या या कार्याची संपूर्ण इंदापूरात चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या आजींची फक्त अडीच एकर जमीन आहे. यापैकी एक एकर जमीन त्यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवली असून उर्वरित जमीन त्यांनी आपल्या मुलाबाळांना देण्याचा निर्णय घेतला आहे (81 year old woman reserved one acre of land for birds).

या आजींचं नाव सरस्वती भिमराव सोनवणे असं आहे. त्यांनी विकतच्या पाण्यावरती जगवलेलं अडीच एकरावरील पीक सध्या बहरात आलेले आहे. पिकातील जवळपास सर्वच ज्वारीच्या कणसावर ज्वारी दिसून येत आहे. सरस्वती सोनवणे या सध्या 81 वर्षाच्या आहेत. त्या लहानपणापासूनच पक्षांवर अपार प्रेम करत आल्या आहेत. विशेष म्हणजे शेतात येणाऱ्या पक्षांसाठी त्यांनी पिण्याची पाण्याची देखील सोय केली आहे. त्यांनी शेतात काही ठिकाणी पाण्याच्या बाटल्या पाणी भरून ठेवल्या आहेत (81 year old woman reserved one acre of land for birds).

इंदापूर तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र वाढल्याने ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे धान्यावर अवलंबून असणाऱ्या या पक्षांची सध्या अडचण निर्माण झाली आहे. पक्षांसाठी नेहमीच आपुलकी असणाऱ्या या सरस्वती आजींनी हीच गरज ओळखून आपल्या शेतातील ज्वारीच्या पिकातील ज्वारी पक्षांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्या एक एकरातील ज्वारीच्या पिकात अनेक प्रकारचे पक्षी येत आहेत. पिकातील जवळपास सर्वच कनसातील ज्वारी पक्ष्यांनी खाल्लेली दिसून येत आहे. त्याचबरोबर शेजारीच पाण्याच्या बाटल्या आणि त्यात पाणी असल्याने पक्ष्यांची चांगलीच मेजवानी या ठिकाणी होत आहे.

शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत आधुनिकी तंत्रामुळे पक्ष्यांचा किलबिलाट कमी होत चाललेला आहे. तर दुसरीकडे शेतकरी ज्वारी-बाजरीच्या पिकात उत्पादन घट होत असल्याकारणामुळे हे पीक घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष्यांना खाण्यासाठी खाद्य कमी होत चाललेले आहे. असे असले तरी सरस्वती आजींनी त्यांच्या मुलाबाळांच्या सोबतच पक्षांसाठी राखून ठेवलेल ज्वारीचे हे क्षेत्र पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरून आलेले आहे.

काही ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी ज्वारी-बाजरी खाण्यासाठी आलेल्या पक्ष्यांना शेतातून हुसकावून लावतात. यातून पक्षांची दे माय धरणी ठाय अशी अवस्था होऊ लागलेली आहे. पण यातूनही 81 वर्षांच्या या आजींनी त्यांच्या जिगरबाज वृत्तीने पक्षांसाठी दाखवलेली ही माया खरंच इतर शेतकऱ्यांना विचार करणारी ठरणार आहे.

हेही वाचा : कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं: नितीन गडकरी