
पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये क्लोरिफाईड कंपनी जी सॅनिटायजर तयार करते. त्या कंपनीला ही भीषण आग लागली. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे.

दुपारी चार वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीचे नेमके कारण कळाले नसले तरी सॅनिटायजर हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची यंत्रणाही फेल ठरत आहे.

कंपनीत सकाळी 41 च्या जवळपास कामगार कामावर आले होते. ज्यातील 17 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून यात 15 महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत होतं. काही वेळातच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता.