
Ajit Pawar Rohit Pawar Sugar Factory: आमदार रोहित पवार हे सातत्याने अजितदादांचा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. त्यांनी चार पत्रकार परिषदेतून तपास यंत्रणांना घाम फोडला आहे. विविध पुरावे आणि यंत्रणांचे दावे खोडून काढणारे प्रेझेटेन्शन यामुळे ते चर्चेत आहेत. अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी DGCA आणि इतर यंत्रणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे. या अपघाताची निष्पक्ष चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांनी दिल्लीत विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तर लवकरच ते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सुद्धा ते भेट घेतील. दरम्यान आता या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे दादांचा विमान अपघात?
भाजप युवा मोर्चाने रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यावर गंभीर आरोप केले आहेत. कारखान्यातून निघाणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी या अपघाताचा संबंध रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्याच्या धुराशी जोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्याची मागणी सोलनकर यांनी केली आहे.
कोणता आहे साखर कारखाना?
भाजप युवा मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात शेठफळ गडे येथील साखर कारखान्यामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या तक्रारी भेडवसावत आहेत. शेतीवरही त्याचा परिणाम होत आहे. दादांच्या विमानाचा अपघात झाला. त्यादिवशी बारामती परिसात धुरामुळे दृष्यमानता कमी होती का? औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके तयार झाले होते का? याची वैज्ञानिक तपासणी होणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला. कारखान्याचा धूर विमानतळासाठी अडथळा ठरतो की नाही, याचे सादरीकरण रोहित पवार यांनी स्वतःहून करावे असे आव्हान सोलनकरांनी दिले. तर रोहित पवार यांनी हे सर्व आरोप राजकीय द्वेषातून करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.