15 मिनिटांत चार्जिंग, 300 किलोमीटरचा प्रवास, या कारचं नितीन गडकरींच्या हस्ते अनावरण

| Updated on: Sep 30, 2022 | 7:54 PM

देशात 60% सोलर वापरावर गाड्या व्हाव्यात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे.

15 मिनिटांत चार्जिंग, 300 किलोमीटरचा प्रवास, या कारचं नितीन गडकरींच्या हस्ते अनावरण
नितीन गडकरींनी सांगितली गुंतवणुकीची संधी
Image Credit source: social media
Follow us on

सुनील थिगळे, Tv9 मराठी, पुणे : मर्सिडीज बेंझ कंपनीनं देशातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माण केली. भारतीय बनावटीचे पाहिले इलेक्ट्रिक वाहनाचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. फक्त 15 मिनिटात ही इलेक्ट्रिक कार चार्जिंग होईल. 300 किलोमीटरपर्यंत प्रवास करणारी देशातील सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक लक्झरी कार ठरणार आहे. या कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत अनावरण करण्यात आले. पुणे येथील चाकणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बदल होत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत मोहिमेला बळकटी देण्यासाठी इंधन बचतीचा मार्ग यामुळे सुलभ होणार आहे. इलेक्ट्रिकल दुचाकीनंतर इलेक्ट्रिकल चारचाकी वाहनांची मागणी लक्षात घेता केंद्र सरकार या उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण राबवत आहे. यातूनच सामान्य नागरिकांना इलेक्ट्रिकल कारमुळे फायदाच होणार असल्याचे मत गडकरींनी व्यक्त केले.

60% सोलर वापरावर गाड्या व्हाव्यात

इलेक्ट्रिकल वाहन इंधन बचतीसाठी मोठा पर्याय भारतासमोर आहे. यामुळे मोठं प्रदूषण आपण रोखू शकू अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली. देशात 60% सोलर वापरावर गाड्या व्हाव्यात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे.

बेंझने पहिलं मॉडेल हे इलेक्ट्रिकमध्ये काढलं आहे. फास्ट चार्जिंग होणारी ही गाडी आहे. एका चार्जिंगमध्ये 300 किलोमीटर अंतर जाणारी गाडी फायदेशीर आहे. फक्त गाडीची किंमत कमी केली पाहिजे म्हणजे सर्वसामान्य ही गाडी वापरतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ई वाहनातील दुचाकी वाहनाची मागणी वाढत आहे. आता चारचाकी वाहनाची मागणी वाढेल. त्यामुळे भारत सरकार यासाठी एक धोरण तयार करत आहे.