Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू…आईने उचलले हे धक्कादायक पाऊल

Pune News | पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे. बिबटे गावाकडे येत आहेत. गावात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात तीन दिवसांपूर्वी एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या मातेने धक्कादायक पाऊल...

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू...आईने उचलले हे धक्कादायक पाऊल
leopard file photo
| Updated on: Oct 12, 2023 | 12:28 PM

पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव गावकऱ्यांना होत आहे. तीन दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील आळे येथे बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात शिवांश भुजबळ या मुलाचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूमुळे त्याची आई निराश झाली. त्या मातेने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे त्या मुलाच्या आईने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. शिल्पा भुजबळ असे त्या मातेचे नाव आहे. आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बिबट्याच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील इतर बातम्या…

सुवर्णपदक विजेती स्नेहल शिंदे गणपतीच्या चरणी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाकडून स्नेहल शिंदे हिच्या संघाने सुवर्णपदक पटकवले होते. स्पर्धेनंतर स्नेहल पुणे शहरात आली. गुरुवारी त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनास आल्या. त्यामुळे पुण्यात आल्यावर स्नेहल शिंदे यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिरापासून स्नेहलची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

सिलेंडरमधून गॅस चोरी, पोलिसांची कारवाई

घरगुती सिलेंडरमधून मोठ्या सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्यांवर चाकण पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता घरगुती सिलेंडरमधून व्यायसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरले जात होते. घरगुती गॅस दर आणि व्यावसायिक गॅस यांच्यातील दरात मोठा फरक आहे. यामुळे घरगुती गॅसचा काळाबाजार केला जात होता. या प्रकरणी चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले आहेत.

पीएमपी बसेसच्या संख्या वाढवल्या

पिंपरी- चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता निगडीमधून कात्रजला जाण्यासाठी पीएमपी बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. निगडवरुन कात्रजसाठी ३८० फेऱ्या बस होत्या. आता त्याची संख्या ४७२ करण्यात आली आहे. यामुळे निगडी येथून कात्रजला जाणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. निगडी ते कात्रज या मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. आता फेऱ्या वाढल्याने प्रवाशी संख्या अधिक वाढणार आहे.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली आयुक्तांची भेट

महानगरपालिकेमध्ये वर्ग-३ आणि वर्ग-४ पदांवर नोकरभरतीमध्ये माजी सैनिकांना राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. परंतु त्यांना नोकरी दिली जात नाही. पुणे महानगरपालिकेत २००३ साली माजी सैनिकांची अस्थायी कामगार म्हणून भरती करण्यात आली होती. २००५ मध्ये या माजी सैनिकांनी नोकरीत कायम करावे या मागणीसाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. माजी सैनिकांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. माजी सैनिकांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.