
मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे. इंदापूर – पुणे-सोलापूर महामार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. भिगवणमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात पूरस्थिती
इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे, मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला आहे. विशेषतः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. भिगवण बस स्थानकात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं आहे.
दरम्यान दुसरीकडे दौंडला देखील पावसानं झोडपलं आहे. दौंडमधील स्वामी चिंचोली गावाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत.
कालवा फुटला
दुसरीकडे बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडलं आहे. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरूच होते, त्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला यामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने नीरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान एनडीआरएफच्या दोन टीम दौंड आणि बारामती तालुक्यात दाखल झाल्या आहेत, पुणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका
बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत असून नदी पात्र, कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा.असे आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे यांचं नागरिकांना आवाहन
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. ‘बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेली तीन चार दिवसांपासून संततधार आहे. यामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही ठिकाणी रस्त्यांवर देखील पाणी आले आहे. माझे नागरीकांना आवाहन आहे की कृपया पुढचे काही दिवस आपण काळजी घ्यावी. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. याखेरीज जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए आणि महापालिका आयुक्त यांनाही विनंती आहे की कृपया आपण सततच्या जोरदार पावसाची नोंद घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय कराव्या. यासह जेथे पावसाने नुकसान झाले आहे तेथे मदत पोहोचविण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.’ असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत केलं आहे.
मराठवाड्यालाही झोडपलं
दरम्यान दुसरीकडे मराठवाड्यात देखील जोरदार पावसानं हजेरली लावली आहे, पावसाचा सर्वाधिक फटका हा जालना जिल्ह्याला बसला आहे, जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. अंबड आणि बदनापूरला पावसानं झोडपलं आहे. ग्रामीण भागांमध्ये पावसाच मोठा फटका बसला असून, शेतात पाणी साचलं आहे.
जालना, बदनापूर आणि अंबड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात या मान्सून पूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे बदनापूर आणि अंबड शहरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ रस्ते जलमय झाले, तर दुसरीकडे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आज सकाळपासूनच जालना जिल्ह्याचं वातावरण दमट होत. हवामान विभागाकडून जिल्ह्याला दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या देखील जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, या पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्येही तडाखा
दरम्यान उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, नाशिक जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पाऊस झाला. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिन्नर बसस्थानकात स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. सिन्नर बसस्थानकाती फलाट क्रमांक एक ते सहा दरम्यानचा स्लॅब कोसळला आहे. सध्या या ठिकाणी मलबा हटवण्याचं काम सुरू असून, बसस्थानक प्रवाशांसाठी बंद करण्यात आलं आहे, प्रवाशांना भर पावसात उभं राहून बसची वाट पाहावी लागत आहे, प्रवाशांचे हाल सुरू आहेत. सिन्नर तालुक्यातील ढग्या डोंगर परिसरात देखील अतिमुसळधार पाऊस झाला आहे, या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
खबरदारी म्हणून सिन्नर शहराला जोडणारे नवापूल, खासदार पूल आणि पडकी वेस येथील पूल प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत. अनेक भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.
लासलगावमध्ये जोरदार पाऊस
लासलगावमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे, पाऊस केवळ दहा मिनिटच झाला, मात्र अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दर रविवारी लासलगाव येथे आठवडी बाजार असतो, अशातच संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले, 10 मिनिटे झालेल्या या वादळी वाऱ्यासह पावसाने व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
वाशिमलाही झोडपलं
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आज मुसळधार पावसाने चांगलचं झोडपून काढलं आहे. वाशिम जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस पडत असून, यामुळे भुईमूग, मूग, या उन्हाळी पिकाचे नुकसान झालं आहे. तर सततच्या पावसाने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागितीची कामे रखडल्याने खरीप पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता आहे. सतत पाऊस होत असल्याने नांगरून ठेवलेली शेती पुन्हा तयार करण्याची वेळ येणार असून, त्यामुळे मशागतीचा दुबार खर्च शेतकऱ्यांना कारवा लागणार आहे.
साताऱ्यातही पाऊस
सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागातील तलाव मान्सून पूर्व पावसातच ओसंडून वाहू लागले आहेत. आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे रानंद, मार्डी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे, याबरोबरच गोंदवले रानंद रस्त्यावर असणाऱ्या पुलावर देखील पुराचे पाणी आल्यामुळे पुलावरून रस्ता ओलांडणारी गाडीमध्येच बंद पडल्यामुळे स्थानिकांनी ही गाडी पुराच्या पाण्यातून बाहेर ओढून काढल्याचं पाहायला मिळालं. या भागातील डंगरेवाडीचा पूल देखील या पावसामध्ये वाहून गेला आहे.
सातारा जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडत आहे, या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे, कालपासून फलटण आणि खंडाळा या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, पावसामुळे फलटण येथील कोळकी फलटण रस्त्यावरील ओढ्याला पूर आला आहे. एका दुचाकी चालकाने या पुलावरून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर दुचाकी वाहून जाऊ लागली. तात्काळ ओढ्या लगत असणाऱ्या नागरिकांनी दुचाकी सह चालकाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, त्यामुले मोठा अनर्थ टळला आहे.
वर्ध्यातही पाऊस
दरम्यान वर्धा जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे, विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह झालेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं, शेतात पाणी साचल्यामुळे पेरणीपूर्व कामांना विलंब होण्याची शक्यता आहे.
पंढरपूरमध्ये मुसळधार
पंढरपूर तालुक्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली, माळशिरस तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. रेडे गावातील ओढा सध्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला असून, बधाऱ्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे जुना वाहतुकीचा पूल पाण्याखाली गेला आहे.रेडे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. बंधारा आणि ओढ्यातील ओव्हरफ्लो पाण्याने पूर सदृश्य परिस्थिती माळशिरस तालुक्यात निर्माण झाली आहे.
अकोल्यात जोरदार पाऊस
अकोल्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अकोल्याच्या ग्रामीण भागांसह शहरात जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या 28 मेपर्यंत अकोल्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. उद्या 26 मे रोजी विजेच्या कडकडाटासह हवेचा वेग ताशी 40 किमीपेक्षा अधिक राहणार आहे. येत्या 28 मे पर्यंत अकोल्यात पाऊस असणार आहे, अशी शक्यता हवामानाने विभागाने वर्तवली आहे.
रत्नागिरीला झोडपलं
रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं. संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली या तालुक्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानुसार उद्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमूसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
गुहागरमध्ये पावसाची हजेरी
गुहागर तालुक्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. धोपावे मधील गणेश नगर परिसरात ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरलं आहे, त्यामुळे येथील नागरिकांना प्रशानसनाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चिपळूणमध्ये चार जण पुराच्या पाण्यात अडकले
दरम्यान दुसरीकडे चिपळूणलाही पावसाचा तडाखा बसला आहे. चिपळूणच्या खडपोली येथे चार व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना घडली आहे. मात्र नगरपालिका आणि अग्निशमन दलानं त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं आहे, सर्व जण सूखरूप आहेत. मासेमारीसाठी तरुण पाण्यात उतरले होते, मात्र संध्याकाळच्या वेळेला
अचानक पाणी वाढल्यामुळे ते पुराच्या पाण्यात अडकले, चिपळूण आपत्ती व्यवस्थापन टीम आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत त्यांचा जीव वाचवला आहे.
मुंबईतही पाऊस
दरम्यान मुंबईतही आज सकाळपासून पाऊस पडत आहे, काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार असं पावसाचं स्वरुप आहे. महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे.