शिर्डीतील दर्शन मर्यादा वाढवली, रोज किती भाविक दर्शन घेऊ शकणार?

| Updated on: Dec 20, 2020 | 4:13 PM

साई संस्थानकडून रोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र, जास्त गर्दी झाल्यास दर्शन बंद केलं जाणार असल्याचंही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

शिर्डीतील दर्शन मर्यादा वाढवली, रोज किती भाविक दर्शन घेऊ शकणार?
Follow us on

शिर्डी: साई बाबा यांच्या मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली आहे. अनलॉकनंतर आतापर्यंत रोज 6 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळत होती. पण आता रोज 12 हजार भाविक साईंचं दर्शन घेऊ शकणार आहेत. साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करावं असं आवाहनही साई संस्थानकडून करण्यात आलं आहे. नाताळमुळे होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.(Increase in the number of devotees coming for darshan from Sai Sansthan)

कोरोनाचं संकट टळलं नसलं तरी प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभूमीवर साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साई संस्थानकडून रोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र, जास्त गर्दी झाल्यास दर्शन बंद केलं जाणार असल्याचंही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर सुट्टीच्या दिवशी शिर्डीमध्ये ऑफलाईन बुकिंग काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत.

साई संस्थानकडून रोज 12 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. त्यात 8 हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर 4 हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत. 31 डिसेंबरला मंदिर खुलं ठेवायचं की नाही, याबाबत मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.

साई संस्थानचा भाविकांसाठी ड्रेस कोड!

साई मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तोडके कपडे घालून मंदिरात येऊ नये. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी भारतीय पेहरावातच यावं, असा एक बोर्ड साई मंदिर संस्थानकडून मंदिर परिसरात लावण्यात आला होता. त्यावरुन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी साई संस्थाननं लावलेला बोर्ड काढणारच असल्याचं सांगत शिर्डीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखत संभाव्य राडा टाळला. दरम्यान, तृप्ती देसाई यांनी विरोध करण्यासाठी स्थानिक महिला शिवसैनिक आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्या शिर्डीत होत्या. तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये येऊ द्या, आम्ही त्यांना शेंदूर फासणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण पोलिसांनी हस्तक्षेप करत देसाईंनी शिर्डीबाहेरच रोखत पुढील वाद टाळला.

रोहित पवारांचाही ‘त्या’ फलकाला विरोध

अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना शिर्डीत साई संस्थानाकडून लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर रोहित पवार यांनी साई संस्थानाला अप्रत्यक्षरित्या फटकारले. मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते. लोकांना ही गोष्ट कळते. मात्र, तरीही आपण मंदिरात फलक लावणार असू तर ती गोष्ट योग्य नाही. भारतीय संविधानात तसे सांगितले आहे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या:

साई मंदिराबाहेरील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच : तृप्ती देसाई

मंदिरात तोकडे कपडे नको, भारतीय पेहरावात दर्शनासाठी या, साईबाबा संस्थानचे आवाहन

Shirdi Sai sansthan’s big decision for devotees