बाप, भाऊ आणि आजी पाण्यात बुडत होते, 7 वर्षाच्या तनुजाने जन्मदात्याला वाचवलं, वाचा तिच्या धाडसाची गोष्ट…

| Updated on: Mar 07, 2021 | 7:37 PM

आजी आणि भावाचा मृत्यू झाला पण 7 वर्षीय तनुजाने जन्मदात्या बापाला वाचवलं. कुटुंबासाठी तनुजाने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन प्रयत्नांची पराकष्ठा केली.

बाप, भाऊ आणि आजी पाण्यात बुडत होते, 7 वर्षाच्या तनुजाने जन्मदात्याला वाचवलं, वाचा तिच्या धाडसाची गोष्ट...
7 वर्षीय तनुजाच्या धाडसाची गोष्ट......
Follow us on

कराड (सातारा) : संरक्षण कठडा नसलेल्या फरशी पुलावरुन दुचाकी नदीत पडल्याने झालेल्या दुर्घटनेत आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाला. पण सात वर्षीय तनुजाने आपल्या जीवाची बाजी लावून जन्मदात्याला वाचवलं. भाऊ आणि आजीलाही तिने जवळपास वाचवलं होतं. अगदी नदीच्या काठावर आणून ठेवलं होतं. पण क्रूर नियतीच्या मनात काही वेगळं होतं. काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरुन पाण्यात पडले. या दुर्दैवी घटनेत तनुजाच्या आजी आणि भावाचा मृत्यू झाला. कुटुंबासाठी 7 वर्षीय चिमुकलीने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन प्रयत्नांची पराकष्ठा केली. तनुजाच्या या साहसी कृत्याबद्दल आता तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Karad Grandmother grandson drowned in Wang River 7 years old tanuja Courage Story)

एकाच दुचाकीवरुन कुटुंबातील चौघे प्रवास करत होते. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची कराड पोलिसात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

तनुजाची घरची पार्श्वभूमी काय…?

येरवळे येथील शरद यादव शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना पोहता येत नाही. मात्र मुलगी तनुजाला त्यांनी स्वीमिंगला दाखल केले आहे. त्याठिकाणी पोहण्याचे तिचे प्रशिक्षण सुरु आहे. त्यात ती तरबेजही झाली आहे. पोहण्याच्या स्पर्धेत तिने ठिकठिकाणी बक्षिसे पटकावली आहेत. पोहण्यात तरबेज असणाऱ्या तनुजाने कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे.

तनुजाचे बाबा, आजी आणि भाऊ तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणून पाण्याबाहेर काढले. काठावर आणले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडिलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. बाहेर काढत असताना तोवर काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडली.

नियतीने डाव साधला, आजी नातवाचा जीव गेला

घटनेची माहिती मिळताच येरवळेसह परिसरातील नागरिकांनी धाव तिकडे घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. शोध मोहिम राबविली. त्यानंतर भावाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र नियतीने तोवर डाव साधला अन् आजी अणि नातवाचा जीव त्यात गेला.

जन्मदात्याला वाचवलं पण भाऊ-आजी मात्र गेले….

वडील शरद यादव यांना वाचविण्यात तनुजा यशस्वी ठरली. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तिने केलेले धाडस वाखाणण्याजोगे ठरले. तेही केवळ सात वर्षाच्या जिगरबाज मुलीने जिवाची पर्वा न करता पोहण्याचा कलेचा पुरेपूर वापर करत तिघाचाही जीव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले खरे मात्र तिच्या धडपडीला पुर्णत: यश आले नाही. आजी अणि भावाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

(Karad Grandmother grandson drowned in Wang River 7 years old tanuja Courage Story)

हे ही वाचा :

चौघांचा गाडीवर प्रवास, चौघेही नदीच्या पाण्यात पडले, सात वर्षाच्या पोरीने बापाला वाचवलं, आजी नातवाचा बुडून मृत्यू