Mayuri jagtap
Image Credit source: Tv9 Marathi
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. वैष्णवीने आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे लव्ह मॅरेज झाले होते, पण लग्नानंतर तिचा सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. या प्रकरणावर हगवणे कुटुंबीयांची थोरली सून मयूरी जगतापने प्रतिक्रिया दिली. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या…
- वैष्णवीचं लग्न झाल्यानंतर तिला माझ्या विरोधात भरवलं गेलं. मला तिच्या विरोधात भरवलं गेलं. मयुरीला बाळ होत नाही, तिच्याकडे तुझं बाळ देऊ नको असं तिला सांगायचे.
- ही घटना घडली तेव्हा माझे पती माझ्या सासू बाई आणि वैष्णवीची आईसाठी खेड मंचरला डबा घेऊन गेले होते. नवलेंची आमची आत्या आहे, तिच्या मुलीचे पती वारले होते त्यामुळे ते तिकडे गेले होते.
- वैष्णवी माझ्याशी बोलली जरी असती तरी मी तिची साथ दिली असती. कारण त्या घरात मी डेअरिंग दाखवली म्हणून आज जिवंत आहे. मी गप्प बसले असते तर मीही कदाचित इथे नसतेच. पण वैष्णवीने मला सांगायला हवं होतं. तिने घरच्यांना सांगायचं होतं. तिने तसं केलं नाही. नवरा आणि नणदेचं ती ऐकत गेली. माझ्याशी ती बोलली असती तरी तिला या लोकांनी मारलं असतं. इतके ते डेंजर होते. तिला त्रास होऊ नये म्हणून मी तिच्याशी बोलले नाही.
- दीड वर्ष आम्ही वेगळं राहत होतो. तिला अॅडमिट केलं हे आम्हाला समजलं होतं. पण ती विष प्यायली होती हे आम्हाला माहीत नव्हतं. तिला फूड पॉयझनिंग झालं असं सांगितलं गेलं होतं. कालांतराने तिने विष प्यायल्याचं आम्हाला कळलं होतं.
- (वैष्णवीच्या) तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता की नाही माहीत नाही. सासू, नणंद आणि दीर यांच्यातच सर्व चालायचं. आमच्यापर्यंत काही येत नव्हतं. माझ्या मिस्टरांनाही कधी काही कळू दिलं नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?
वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांचे लव्ह मॅरेज झाले होते. घरच्यांचा विरोध असूनही वैष्णवीने हे लग्न केले. वैष्णवीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नात शशांकला ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी देण्यात आली होती. तसेच २० हजार रुपयांचे घड्याळ देण्यात आले होते. काही चांदीच्या वस्तू देखील देण्यात आल्या होत्या. तरीही हगवणे कुटुंबियांची हाव कमी झाली नाही. सतत वैष्णवीला मारहाण करण्यात येत असे. सासरच्यांनी तिचा बराच छळ केल्याचे म्हटले जाते.