Pune Amitabh Gupta : पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी बोलावली बैठक; कायदा-सुव्यवस्थेवर राजकीय पक्षांशी करणार चर्चा

राजकीय पक्षांकडून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी पुणेकरांनी या वादाला दाद दिली नाही. त्यामुळे खरी समज राजकीय पक्षांनाच देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षा तसेच इतर मुद्द्यांवर अमिताभ गुप्ता काही सूचना राजकीय पक्षांना करण्याची शक्यता आहे.

Pune Amitabh Gupta : पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी बोलावली बैठक; कायदा-सुव्यवस्थेवर राजकीय पक्षांशी करणार चर्चा
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 9:37 AM

पुणे : पुण्यातील वाढत्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune police commissioner Amitabh Gupta) यांनी बैठक बोलावली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच इतर पक्षांनाही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त गुप्ता आज राजकीय पक्षांशी (Political parties) चर्चा करणार आहेत. पुण्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांमध्ये विशेषत: राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसे यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. चार दिवसांपूर्वीच हा संघर्ष भाजपा आणि राष्ट्रवादीत (BJP Vs NCP) झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आज 11.30 वाजता पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. या मुख्य पक्षांसह इतर पक्षांनाही या बैठकीचे आमंत्रण आहे. शहराची सध्याची परिस्थिती पाहता कायदा-सुव्यवस्था बिघडू नये. ती अबाधित राहावी, यासंदर्भात पोलीस आयुक्त राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहेत.

भाजपा-राष्ट्रवादी संघर्ष

अलिकडेच भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचा पुण्यात कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात संघर्ष झाला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला होता. तर दुसरीकडे भाजपा प्रवक्ते विनायक आंबेकर यांना आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कानशिलात लगावली होती. हा वाद सुरू असतानाच तिकडे राज ठाकरे यांच्या सभेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 22 तारखेला राज ठाकरे यांची गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी सकाळी दहावाजता सभा होणार आहे. भोंगे, अयोध्या दौरा, हिंदुत्व अशा मुद्द्यांवरून पुण्यात आधीच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांना बोलावले

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना बोलावले आहे. पुण्याची ओळख शांत शहर अशी आहे. राजकीय पक्षांकडून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी पुणेकरांनी या वादाला दाद दिली नाही. त्यामुळे खरी समज राजकीय पक्षांनाच देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षा तसेच इतर मुद्द्यांवर अमिताभ गुप्ता काही सूचना राजकीय पक्षांना करण्याची शक्यता आहे.