पंतप्रधान मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर राज ठाकरे यांची खरपूस टीका; काय म्हणाले?

आजच्या परिस्थितीत कलावंत नसते, कवी नसते, शिल्पकार नसते, लेखक नसते, चित्रकार नसते, गायक आदी लोक नसते तर या देशात कधीच अराजक आलं असतं. पाकिस्तानची अवस्था पाहतोय आपण. तुम्हा लोकांमध्ये येथील जनता गुंतून पडली आहे. ते तुमच्यावर प्रेम करतात. तुमच्यात ते गुंतून पडले म्हणून त्यांचं बाकीच्या गोष्टींवर दुर्लक्ष झाले. त्यामुळे मी नेहमी तुमचे आभार मानतो. ही मंडळी नसती तर या देशात काय झालं असतं? फक्त संध्याकाळच्या सीरिअल बंद करून बघा. काय आक्रोश होईल. खऱ्या सासू सुनांमध्ये लागेल. तिथेही दुर्लक्ष झालं असेल ना सीरिअलमुळे, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला.

पंतप्रधान मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर राज ठाकरे यांची खरपूस टीका; काय म्हणाले?
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 07, 2024 | 6:47 PM

रणजित जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 7 जानेवारी 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनवर जोरदार टीका केली आहे. बुलेट ट्रेनच्या प्रयोजनावरच राज यांनी बोट ठेवलं आहे. मला बुलेट ट्रेनचं काही कळलं नाही. बुलेट ट्रेनने दोन तासात अहमदाबादला जाता येणार आहे. काय करणार? ढोकळा खाणार आणि येणार. करायचं काय? मुंबईत चांगला मिळतो ढोकळा. त्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. मराठी माणसाचं चारही बाजूला लक्ष हवं. तो दक्ष असला पाहिजे. मी काल सांगितलं ते आजही तेच सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांची अखिल भारतीय नाट्य संमेलनात मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पावरूनही त्यांनी टीका केली. इतिहास नेहमी भूगोलावर अवलंबून असतो. भूगोल म्हणजे जमीन. जगातील सर्व युद्धे ही जमिनीसाठीच झाली आहेत. या लढ्यांना आपण इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून बळकावली जायची. आता चालाखीने घेतली जाते. जमीन कधी गिळंकृत करतात हे तुम्हाला कळूही देत नाही. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व. तेच तुमच्या हातून गेले तर कोण तुम्ही? असं सांगतानाच शिवडी-नाव्हा शेवा मार्ग झाल्याने रायगड जिल्हा बरबाद होणार आहे. त्याकडे आमचं लक्ष नाही. बाहेरची लोक येत आहेत. जमीन खरेदी करत आहे. आपला माणूस नोकर म्हणून राहील. नाही तर रायगड सोडावं लागेल, अशी धोक्याची सूचना राज ठाकरे यांनी दिली.

लता दिदी म्हणाल्या, वाह…

राज ठाकरे यांनी यावेळी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्याशी जेव्हा कधी फोनवर बोलणं झालं. तेव्हा त्यांनी, मी लता मंगेशकर बोलतेय असं कधीच म्हटलं नाही. मला एकदा त्यांचा पहिल्यांदाच फोन आला. त्या म्हणाल्या, नमस्कार. मीही म्हटलं, नमस्कार. त्या म्हणाल्या राज ठाकरे आहेत का? मी म्हटलं, बोलतोय. त्या म्हणाल्या, नमस्कार, मी लता. मी म्हटलं कोण लता? अहो मला कसं कळणार?

मग त्यांनी सांगितलं लता मंगेशकर. म्हटलं तुम्ही का फोन केला? मीच आलो असतो. मग मी त्यांना भेटलो. त्यानंतर त्यांच्याशी संबंध वाढत गेला. त्यांच्यावर मी एक पुस्तक काढत आहे. त्यांचं पुस्तक प्रिंट झालं आहे. पुस्तकाचं कव्हर मी त्यांना दाखवलं होतं. त्यावेळी त्या वाह… असं म्हणाल्या. हे तूच करो जाणे, असं म्हणत त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली होती, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

आपण पुढे कधी जाणार?

यावेळी राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. निवडणुका लढवतानाही मला लाज वाटते. राज्यात जातो. तेव्हा वाटतं माझा काकाही तेच म्हणायचा. आजोबाही तेच म्हणायचे आणि मीही तेच म्हणतोय. सभेत जातो तेव्हा मी काय सांगतो? मी तुम्हाला पाणी देईन, रस्ते देईन, लोडशेडिंग दूर करेन, 70 वर्ष त्याच विषयांवर आपण निवडणुका लढवतोय. आपण पुढे कधी जाणार?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.